मक्याची शासकीय हमीभावाने खरेदी तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील विविध शेतकरी संघटना आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या नेतृत्वाखाली सोमवारी देवळा-कळवण रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
सकाळी अकरा वाजता देवळा शहरातील पाच कंदिल परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले. तेथून निषेध मोर्चा काढत बाजार समितीच्या आवारात प्रवेश करून सुरू असलेला मका लिलाव बंद करण्यात आला. त्यानंतर देवळा कळवण रोडवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत सरकारविरोधी निषेध दिल्या.
केंद्र सरकारने मक्यासाठी २४०० रुपये प्रति क्विंटल शासकीय दर जाहीर केलेला असतानाही राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. आंदोलन एक तास सुरू होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार बबन आहीरराव, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, बाजार समितीचे अध्यक्ष योगेश आहेर यांनी शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, प्रहार संघटनेचे उमेश आहेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष पंडित निकम आदींशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
तुमच्या भावना शासनाकडे पोहोचवल्या जातील असे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रशांत शेवाळे, कुबेर जाधव यांनी शासनाने मका हमीभावाने खरेदी केला नाही तर चार दिवसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
यावेळी माणिक निकम, संदीप वाघ, रामकृष्ण जाधव, विश्वनाथ गुंजाळ, गोरख गांगुर्डे, सुनील शिंदे, विलास शिंदे, विजय आहेर, सोमनाथ शिंदे, आदींसह शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : एक एकर टोमॅटो शेतीतून ६ महिन्यांत ९ लाखांचा नफा; सुलतानवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
