अजय पालीवाल
नगदी पिकांना यावर्षी हवा तसा भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जुलै महिन्यातील अतिवृष्टी, त्यानंतर पावसाचा ताण, बदलते हवामान, उष्याचा दाह, रोग-किडीच्या प्रादुर्भावात वाढ, यामुळे मका-कांदा यासारख्या महत्त्वाच्या पिकांचे उत्पन्न कोसळले आहे.
लिंबू व केळी या पिकांनाही कमी दराचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी कंटाळून मका-कांद्याच्या बाजारभावाला लिंबू बागायत व केळी लागवडीचा मार्ग निवडला होता. मात्र या पिकांचा खर्च-उत्पन्न ताळेबंद हातात येईपर्यंत तुटीचा ठरत असल्याने शेतकऱ्यांचे हात-पाय गळाले आहेत.
मागील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २४ मध्ये जळगाव जिल्ह्याच्या लासूर (ता. चोपडा) गावात ३५०० खोडांची लागवड करण्यात आली. खर्च जरी जास्त झाला तरी भाव तुलनेने ठीक मिळाल्याने खर्च निघाला. मात्र, यंदा भावात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना स्वतःकडील पैसे टाकून माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
लासूर लिलाव बाजारातही लिंबूचे दर तळाला गेले असून शेतकरी इतर बाजारपेठांचा शोध घेत आहेत, पण त्यातूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
लिंबूचे दर कोसळल्याने खर्चही न निघण्याची वेळ
अमळनेर बाजारात २५ किलो उत्तम दर्जा गोणी २५० ते ३०० रुपयांना दिली जात असून २५ किलो सरासरी दर्जाची गोणी १५० ते २०० रुपयांना मिळत आहे. बाजारात पोहोचेपर्यंत १५०-२०० रुपये गोणी इतका आहे.
लिंबू बाजारात नेईपर्यंत आमचा संपूर्ण परिवार दिवसभर कामाला असतो. पण शेवटी मिळणारी मजुरी शून्यच. लावलेला खर्च आणि येणारे उत्पन्न, दोन्ही सारखेच झाले आहेत. - शंकर सोमा महाजन, लिंबू उत्पादक शेतकरी, लासूर ता. चोपडा जि. जळगाव.
एक हेक्टर केळीसाठी लाखो रुपये गुंतवूनही यावर्षी बाजारभावाने पाठीशी घातले नाही. उत्पादन चांगलं असूनही खर्च निघणार नाही, ही चिंतेची बाब आहे. - वसंत दगाजी पाटील, केळी उत्पादक शेतकरी, लासूर ता. चोपडा जि. जळगाव.
उत्पादन-विक्री दरातील प्रचंड तफावत
| शेतकरी दर | लिंबू | ८-१० रु. किलो. |
| बाजारभाव | - | ४०-५० रु. किलो. |
हेही वाचा : एक एकर टोमॅटो शेतीतून ६ महिन्यांत ९ लाखांचा नफा; सुलतानवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
