प्रमोद सुकरेकराड : सध्या नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. या कालावधीत ९ दिवस उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे केळीला मोठी मागणी आहे.
किरकोळ विक्रीचा दर ६० ते ७० रुपये डझन सुरू आहे. पण प्रत्यक्षात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या कवडीमोल दराने केळी विकावी लागत आहेत.
एवढेच नव्हे तर बागेत माल तयार झाल्याने काहीही करा; पण माल तेवढा घेऊन जा, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली दिसत आहे. तरीही व्यापारी खरेदीकडे 'पाठ' फिरवत असल्याने उत्पादकांची 'वाट' लागण्याची वेळ आली आहे.
कराड तालुक्यात अंदाजे १५-२० हेक्टरवर केळी घेतली जात असतील; पण हेच उत्पादक शेतकरी सध्या दर मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत.
उत्पादन खर्च मोठाकेळी उत्पादक घेताना शेतकऱ्यांना एकरी ७० हजार ते १ लाखांपर्यंत खर्च येतो. लागणीत अंदाजे ३० ते ४० टन केळी उत्पादन होतात. तर खोडवा घेतला तर २५ ते ३० टन उत्पन्न मिळते. तसेच शेतकऱ्यांना मेहनत ही भरपूर करावी लागते; पण हे २ तोडे घेण्यासाठी त्यांना २ वर्षे वेळ द्यावा लागतो.
जळगावची केळीच्या मालाची आवक मोठीपश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उसाचे क्षेत्र मोठे त्याप्रमाणे जळगाव परिसरात केळी उत्पादनाचे क्षेत्र मोठे आहे. शिवाय आपल्याकडे व्यापाऱ्यांना शेतातून माल तोडून घ्यावा लागतो; पण तिकडचे बहुतांश शेतकरी माल स्वतः तोडून देतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना ते जास्त सोयीचे ठरते म्हणे.
खरेदी टनावर, विक्री डझनवरकेळीची खरेदी व्यापारी टनावर करत असले तरी किरकोळ विक्री; मात्र डझनावर होत असते. मध्यम प्रतीच्या मालाचा काही दिवसांपूर्वी दर १५ ते १८ रुपये किलो होता.
आम्ही गेल्या २० वर्षापासून केळीचे उत्पादन घेत आहोत. यावर्षी आमची ३ एकर क्षेत्रावर केळीची बाग आहे. पण सध्या दर खूपच कमी झाले आहेत. बागेत माल तयार झाला आहे. पण यापूर्वी चौकशी करून गेलेले व्यापारी आता बागेकडे फिरायला तयार नाहीत. संपर्क केला तर माल कमी किमतीत मागत आहेत. त्यामुळे मीच नव्हे तर केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. - राजन धोकटे, केळी उत्पादक शेतकरी, विरवडे, कराड
अतिवृष्टीमुळे अनेक राज्यांमधील बाजारपेठा काही दिवस बंद होत्या तर अजूनही काही बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणून सध्या केळीचे खरेदीचे दर कमी झाले आहेत. सध्या सात ते आठ रुपये किलो दराने आम्हाला केळी खरेदी करावे लागत आहे. नजीकच्या काळात दर लगेच सुधारतील, असे वाटत नाही. - संदीप कदम, केळी खरेदी व्यापारी, कराड
अधिक वाचा: 'ती'च्या नेतृत्वातून फुलले शेत शिवार; सर्वोच्च पिक उत्पादनात स्मिताताईंच्या गटाची कामगिरी दमदार