जव्हार : जिल्ह्यातील आधारभूत धान्य खरेदी केंद्रे वेळेत सुरू न झाल्याने खरीप हंगामातील पिकवलेला भात घरातून सडण्याची शेतकऱ्यांना भीती होती. शिवाय शेतातील धान्य खासगी व्यावसायिकांना मिळेल भावात देण्याची वेळ आली होती.
त्यामुळे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे आधारभूत धान्य खरेदी नोंदणीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ करण्याची विनंती केली.
ती विनंती मान्य झाल्याने, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आमदार भोये यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आधारभूत धान्य खरेदी केंद्राच्या नोंदणीसाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली.
संबंधितांना कार्यवाहीसाठी आदेश
◼️ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी न झाल्यास धान उत्पादक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
◼️ त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०२५ नंतर पुढील एक महिन्याकरिता नोंदणीची तारीख वाढवून द्यावी.
◼️ तसेच संबंधित मागणीच्या अनुषंगाने त्वरित योग्य कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश द्यावेत, असे निवेदन भोये यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तत्काळ मंजूर केली.
◼️ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून शेतात कष्टाने पिकवलेल्या भाताला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा: जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; नववर्षात आता कुणाला मिळणार किती धान्य?
