Dry Fruit, Nuts : ऐन हिवाळ्यात सुका मेव्याच्या दरवाढीमुळे घरी पौष्टिक लाडू बनविणे जरा कठीण जात आहे. तरी मोठ्या हौशीने आपल्या मुला-मुलींना, सूनबाई व नातवंडांना आजीबाई मेथी, डिंक, उडदाचे पौष्टिक लाडू बनवून खाऊ घालत आहेत.
ग्रामीण भागात आजही हिवाळ्याची चाहुल लागली की महिलांची लाडू तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. आणि घरातील आजीबाईंची लाडू तयार करण्यासाठी लगीन घाई सुरू होते. लाडू तयार करुन कुटूंबाला खाऊ घालण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत असतो.
हिवाळ्यात रब्बी हंगामात शेतात अनेक अंग मेहनतीचे कामे शेतकऱ्यांना करावी लागत असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या लाडूचे सेवन करणे फायदेशीर ठरतात.
परंतू शहरी भागात मात्र काही छोट्या कुटुंबाची मदार तयार लाडूवर आहे. त्याचे कारण असे आहे की, पती-पत्नी दोघेही नोकरी करतात त्यामुळे त्यांची पसंती रेडिमेड पौष्टिक लाडू तयार करुन घेण्यावर जास्त असते. यंदा नेहमीपेक्षा सुका मेवा व रेडिमेड लाडूंची मागणी चौपट वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
असे आहेत लाडूसाठी आवश्यक पदार्थांचे भाव
प्रकार | भाव(किलो) |
काजू | ९५०-१००० रु. |
बदाम | ७६०-१००० रु. |
पिस्ता | २०००-२२०० रु. |
अक्रोड मगज | १२००-१६०० रु. |
किसमिस | २६०-५०० रु. |
काळी मनुका | ५००-८०० रु. |
खारीक | २००-६०० रु. |
खोबरे | २२०-२४० रु. |
डिंक | ४००-१००० रु. |
गोडंबी | १२५०-१३०० रु, |
मेथी | १००-१२० रु |
गूळ | ६०-६५ रु. |
पिठी साखर | ५५-६० रु. |
उडीद डाळ | १३०-१४० रु. |
डाळ | १३०-१४० रु. |
मेथी, डिंकाचे लाडू खा, हा होईल फायदा
* हिवाळ्यात मेथीचे व डिंकाचे लाडू हमखास बनविले जातात. थंडीने छातीत कफ जाम होणे, सर्दी होणे, असे आजार होतात. यावर मेथीचे लाडू लाभदायक ठरतात.
* विशेषत: मुलांना असे लाडू खाऊ घालतात; ज्यामुळे हाडे मजबूत होऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता, सांधेदुखी दूर होते, अशी माहिती आहारतज्ज्ञांनी दिली.
मगज, काजू, गोडंबी महागले
दीड महिन्यापूर्वी अक्रोड मगज १ हजार १०० ते १ हजार ४०० रुपये किलो भाव होता. सध्या १ हजार २०० ते १ हजार ६०० आहे. काजू ८०० वरून १ हजारावर, गोडंबी २०० रुपयांनी महाग झाली असून १ हजार ३०० रुपये आहे. मात्र, नवीन खारकेची आवक सुरु झाल्याने किलोमागे १०० रुपयांनी भाव घसरले असून २०० ते ६०० रुपये किलो विक्री होत आहे. पिस्ता २०० रुपये कमी होऊन २ हजार ते २ हजार २०० रुपये आहे.
लहान कुटुंबांचा कल रेडिमेड लाडूकडे
पती-पत्नी दोघेही नोकरी करणाऱ्या कुटुंबांची पसंती रेडिमेड पौष्टिक लाडू आहे. कारण, घरी लाडू तयार करणे नवीन पिढीतील अनेकांना जमत नाही व वेळही नसतो. यामुळे लाडूची विक्री वाढली आहे. सध्या रेडिमेड सुका मेवा डिंक लाडू ६६० रुपये किलो, उडीद सुका मेवा डिंक लाडू ६६० रुपये, तर मेथी सुका मेवा डिक लाडू ७०० रुपये किलोने विक्री होत आहे. - राजेंद्र डोसी, सुका मेवा व्यापारी