लाइफस्टाइल हेल्दी राहावी, याकरिता बहुतांश लोक आहारात ड्रॅगन फ्रुटचा (Dragon Fruit) आवर्जून समावेश करतात. या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या अनेक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे बीडच्या बाजारपेठेत पुणे, गुजरातच्या ड्रॅगन फ्रुटची चलती आहे.
विविध आजारांवर गुणकारी (Effective) ठरत असलेल्या ड्रॅगन फळाला सध्या ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. पेशी वाढविण्यासाठी या फळांचा वापर होत असून, पुणे तसेच गुजरातमधील बाजारपेठेतून (Market) यांची खरेदी करून व्यापारी बीडमध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात घेऊन येत असल्याची माहिती विक्रेत्याने दिली आहे.
सध्या हिवाळ्याचे (Winter) दिवस असून, या फळांची विदेशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची आवक होत आहे. तशी त्याची बाजारात ग्राहकांमध्ये मागणी असल्याचे दिसून येत आहे.
येथे होते लागवड
विदेशात तसेच भारतामध्ये त्याची लागवड (Cultivation) केली जाते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि आंध प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जाते.
तसेच महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली, बीड, चिंचोली, केज, चौसाला, नांदूर आष्टी येथेसुद्धा व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड केली जाते आहे.
ड्रॅगनचे प्रकार
* लाल आणि पांढरे असे 'ड्रॅगन' चे दोन प्रकार आहेत.
* पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगनची १०० ते १२० रुपये किलोने, तर लाल रंगाच्या ड्रॅगनची २०० ते २५० रुपये किलोने विक्री केली जात आहे.
* सध्या बाजारपेठेत २ प्रकारचे ड्रॅगन फ्रुट आले आहेत.
काय आहेत फायदे
ड्रॅगन फ्रूट मधील अँटिऑक्सिटंटमुळे प्लेटलेटची संख्या वाढते. फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत होते. पोषक घटकांमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. हाडांना मजबूत करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. कोलेस्ट्रॉल कमी होते. रोग प्रतिकारशक्ती वाढते.
ड्रॅगन फूटमध्ये फ्लेव्होनॉइडस, फिनोलेक्स आदी अँटिऑक्सिटंट असतात. ज्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माण होत नाहीत. रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. - डॉ. अविनाश वाघ
लाल रंगाच्या ड्रॅगन फळाला अधिक मागणी आहे. ड्रॅगन फळाची मागणी सध्या ज्यूस विक्रेते, आइस्क्रीम विक्रेत्यांकडून होत आहे. - शोहेब बागवान, विक्रेते