अलिबाग: किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर खरीप आणि रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ साठी धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार आहे.
ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल २ हजार ३८९ रुपये, तर सर्वसाधारण भाताला २ हजार ३६९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार भात खरेदीचा धान खरीप पणन हंगाम कालावधी ३ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६, तर भरडधान्य खरीप पणन हंगाम १ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा असेल, तर रब्बी पणन हंगाम केंद्रांकडून प्राप्त सूचनांनुसार राहील.
भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यासह गाव नमुना ८ (अ) ची छायांकितप्रत खरेदी केंद्रावर आणणे आवश्यक आहे.
या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी होईल. ७/१२ उताऱ्यानुसार पिकाखालील क्षेत्र, यंदाची पीक परिस्थिती, सरासरी उत्पादन या सर्व बाबी विचारात घेऊन खरेदी केली जाईल.
खबरदारी घेणे आवश्यक
आधारभूत किमत योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या निर्देशात बसणारे एएफएक्यू दर्जाचेच धान, भरडधान्य खरेदी करण्यात येईल. केंद्र शासनाने पणन हंगाम २०२५-२६ साठी आर्द्रता अधिकतम प्रमाण धानासाठी १७ टक्के विहित केलेली आहे.
विहित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त
आर्द्रता आढळल्यास धान/भरडधान्य खरेदी करण्यात येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर, बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी करू नये. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान/भरडधान्य खरेदी केले जाईल याची याची अभिकर्ता संस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी.
ही कागदपत्रे आवश्यक
धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्ड तसेच बँकेच्या पासबुक आणणे आवश्यक आहे.
धान्याच्या किमती अशा...
भात सर्वसाधारण : २, ३६९ प्रतिक्विंटल.
भात (अ ग्रेड) : २, ३८९ प्रतिक्विंटल.
ज्वारी (संकरित) : ३ हजार ६९९ प्रतिक्विंटल.
ज्वारी (मालदांडी) : ३ हजार ७४९ प्रतिक्विंटल.
बाजरी : २ हजार ७७५ प्रतिक्विंटल.
मका : २ हजार ४०० प्रतिक्विंटल.
नाचणी : ४ हजार ८८६ प्रतिक्विंटल.
प्रक्रियेबाबतचे निर्देश
◼️ धान स्वच्छ व कोरडे असून, ते विक्री योग्य (मार्केटेबल) असल्याचे अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावर भाताची खरेदी होईल. खरेदी करताना धान स्वच्छ कोरडे असावे.
◼️ योजनेंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या धानाच्या आधारभूत किमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यास आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना आहेत. शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान/भरडधान्याची खरेदी होणार आहे.
◼️ खरेदी केलेल्या धान/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश आहेत. रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.
◼️ भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा पणन अधिकारी रायगड संबंधित तहसीलदार/गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच उपअभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह. संस्था/खरेदी-विक्री संघ/सह. भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील.
अधिक वाचा: जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
