दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. ग्रामीण भागासह शहरातदेखील लिंबाची मागणी वाढली झाली असून, बाजारात घटलेली आवक आणि मागणी यामध्ये लिंबाचे भाव सध्या गगनाला भिडले असल्याची माहिती लिंबाच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजारात लिंबाची आवक कमी झाली असून, होलसेलमध्ये १२० ते १५० रुपये किलोचा भाव मिळाला आहे. बाजारात आलेल्या लिंबाची आवक कमी झाल्यानेही भाववाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चनंतर उन्हाची तीव्रता वाढली होती. त्या तुलनेत यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाखा वाढला आहे.
यामुळे पाच रुपयांत दोन लिंबू मिळणारे आज मात्र दहा रुपयांचे दोन मिळत आहेत. आवक घटली असल्याचे विठ्ठल आटोळे यांनी सांगितले. सध्या बाजारात आलेल्या लिंबाला हॉटेल, ज्यूस सेंटर आणि घरगुती वापरासाठी अधिक मागणी आहे.
दिवसेंदिवस लिंबाची मागणी वाढत जाणार असून, त्या पटीत लिंबाची आवक घटणार आहे. या अगोदर लिंबाचे भाव ५० रुपये किलो होते. मागणी वाढल्याने दरात एकदम १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबाचे भाव आणखी वाढणार आहेत.
उन्हाळ्यामुळे मागणी
उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांच्या लिंबाला भाव मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात लिंबाची आवक कमी होते. यामुळे लिंबाला भाव मिळतो. त्याचा आज फायदा होताना दिसत आहे. - मरीबा गायकवाड, शेतकरी.
दर आणखी वाढणार
उन्हाळ्यात लिंबाला जास्त मागणी असते. शिवाय हॉटेल चालकांकडूनदेखील मागणी असते. मात्र, उन्हाळ्यामध्ये ज्यूस सेंटर, रसवंतीगृह आणि लग्न घरीदेखील लिंबाला मागणी असते. त्यामुळे बाजारात लिंबाची होणारी आवक आणि मागणी यात प्रचंड मोठी तफावत निर्माण होते. लिंबाचा तुटवडा जाणवतो. यंदा देखील बाजारात लिंबाची आवक कमीच आहे. त्यामुळे दर आणखी वाढतील. - तुकाराम पवार, व्यापारी.