इंदापूर : चालू आठवड्यात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आलेल्या डाळींबाला प्रति किलोस २७५ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे.
पेरुला प्रति किलोस ५५ रुपये दर मिळाला आहे तर ड्रॅगनफ्रूटला प्रति किलोस ८१ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके यांनी दिली.
ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीने इंदापूरच्या मुख्य बाजार आवारात शेतकरी, व्यापारी, खरेदीदारांसाठी डाळींब, पेरु, इतर फळे, भाजीपाल्याची ने-आण करण्याची सोय, बांधणी व घाऊक विक्री व वाहनतळासाठी प्रशस्त जागा, बंदिस्त संरक्षक भिंत, वीज, पाणी, राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
धान्य सफाई यंत्र सुविधा उभारणी केलेली आहे. आंध्र प्रदेश, कोलकाता, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यांतील खरेदीदार डाळींब, पेरु, ड्रॅगनफ्रुट शेतमाल उच्चांकी दरात खरेदी करत आहेत.
अतिवृष्टी व बुरशीजन्य रोगांमुळे डाळिंब पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारातील डाळिंबाची आवक घटली आहे. परिणामी डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे.
बुरशीजन्य रोगांचा प्रकोप; डाळिंबाचे क्षेत्र घटतेय
डाळिंब पिकावर कीडरोगासह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने लागवडीच्या क्षेत्रात घट झाल्याने आवक कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
डाळिंबावरील फवारण्या, देखभालीचा खर्च जास्त
कीडरोग नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी करावी लागते. पिकाच्या देखभालीचा खर्चही अधिक आहे.
अधिक वाचा: साखर कारखानदार आरआरसी कारवाईला जुमानत नाहीत; शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळणार का?