गोडधोड पदार्थांची चव वाढवणारी, चहा-दूध, मसाले, मुखवास आणि मिठायांत हमखास वापरली जाणारी वेलची मागील काही महिन्यांत महागाईच्या झटक्यात आली असून, आता प्रत्येक दाण्याची किंमत तब्बल चार रुपये पडत आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांत स्थानिक बाजारात वेलचीचे दर ३,६०० ते ४,२०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. एका वेलची नगाची किंमत अडीच ते तीन रुपये झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
या दरवाढीमुळे सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर गोड पदार्थ बनवणाऱ्या गृहिणी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
केरळमधून मोठ्या प्रमाणात वेलचीची आवक होत असली, तरी पुरवठ्यातील कमतरता, वाण, आकार आणि चवीवर आधारित किमतीमुळे दरवाढ झाली आहे.
गेल्या आठ महिन्यांत वेलचीच्या किमतीत ६०० रुपयांची वाढ झाली आहे. यंदा सणासुदीत ग्राहकांना जास्त खर्च करावा लागेल.
आरोग्यासाठीही महत्त्वाची
◼️ वेलची केवळ स्वादासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही महत्त्वाची आहे. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असून, पचन, हृदय, ब्लड प्रेशर, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि तोंडाचा दुर्गंध कमी करण्यास मदत होते.
◼️ दात आणि हिरड्यांच्या समस्यांवरही वेलची उपयुक्त आहे. मात्र, वाढत्या किमतीमुळे मसाल्याच्या वापरावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चिंता वाढली आहे.
दर वाढीची कारणे आणि परिणाम
◼️ वेलचीचा पुरवठा प्रामुख्याने केरळमधून होतो.
◼️ किरकोळ बाजारात छटाक २२० रुपये तर तोळा ४५ रुपये दराने विक्री होत आहे.
◼️ वाण, आकार आणि चवीवर दर ठरत आहेत.
◼️ गोडधोड, मिठाई तयार करणाऱ्या गृहिणी आणि व्यावसायिकांमध्ये वाढत्या किमतीमुळे चिंता पसरली आहे.
अधिक वाचा: शेतरस्त्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' ह्या नव्या योजनेची घोषणा; कशी होणार कार्यवाही?