वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच या सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले असून, बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनची आवकही निम्म्यावर आल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मागील महिनाभरापासून बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची आवक होत आहे. या बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या उन्नती ११३५ या सोयाबीन वाणाचे दर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्याही वर पोहोचले होते.
वाशिम बाजार समितीत बिजवाई सोयाबीना मिळणाऱ्या विक्रमी दराची माहिती राज्यातील अनेक जिल्ह्यात पसरली होती. त्यामुळे हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावी, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील शेतकरी वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनच्या विक्रीसाठी धाव घेत होते.
त्यामुळे या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली होती. अगदी सायंकाळपासूनच हिंगोली आणि अकोला मार्गावर दोन किलोमीटर अंतरापर्यंत सोयाबीनची वाहने उभी झाल्याचे दिसत होते.
आता मात्र या बाजार समितीत बिजवाई सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असून, या दर्जाच्या सोयाबीनचे दर आता थेट ६ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण पसरले असून, बाजार समितीत सोयाबीनची आवकही मंदावली आहे.
शनिवारी केवळ ८६०० क्विंटल आवक
वाशिम येथील बाजार समितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची आवक ३० हजार क्विंटलवर पोहोचली होती. त्यावेळी सोयाबीनला आकर्षक दरही मिळत होते. मात्र दरात घसरण सुरू होताच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली आहे. त्यामुळे शनिवारी या बाजार समितीत केवळ ८ हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
असे घसरले बिजवाई सोयाबीनचे दर
०७ नोव्हेंबर - ८५३०
१० नोव्हेंबर - ८४५०
१४ नोव्हेंबर - ८१२०
१८ नोव्हेंबर - ६७२०
२० नोव्हेंबर - ६०००
२१ नोव्हेंबर - ६२१०
२२ नोव्हेंबर - ६०४५
