रत्नागिरी : जिल्ह्यात भाताचे उत्पादन सर्वाधिक असून शासनाकडून केवळ भातालाच हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकला असला तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी वाढती मागणी आहे.
त्यात पारंपरिक लाल तांदळातील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ग्राहकांकडून वाढती मागणी आहे, परंतु शेतकऱ्यांकडे साठा नसल्यामुळे उपलब्धतेस कमी पडत आहेत.
मजुरांची उपलब्धता, मजुरीतील वाढ, खते, कीटकनाशकांचे दर, पावसाची अनियमितता, वन्य प्राण्यांचा उपद्रव यासारख्या विविध कारणामुळे जिल्ह्यातील शेतीचे प्रमाण घटू लागले आहे.
शासनाकडून हमीभाव देण्यात येत असल्यामुळे शेतकरी स्वतःकडील भाताची विक्री करत आहेत. बाजारी तांदळापेक्षा गावठी तांदूळ जाड असला तरी आरोग्याबाबत जागृत असलेली मंडळी भात, भाकरीसाठी गावठी तांदूळ खरेदी करत आहेत.
एकीकडे दैनंदिन सुवासिक तुकडा तांदूळ किंवा बारीक तांदूळ वापरला जात असला तरी गावठी तांदळासाठीही मागणी वाढू लागली आहे.
मात्र, शेतकऱ्यांनी दोन-चार महिन्यानंतर नवीन पीक येणार असल्याने कुटुंबापुरते भात ठेवून उर्वरित भाताची विक्री केली आहे. गावठी तांदळासाठी मागणी होत असली तरी पुरेशी उपलब्धता मात्र होत नाही.
सध्या तांदळाचे दर
गावठी जाड तांदळापेक्षा बाजारी बारीक, सुवासिक तांदूळ खरेदीला चांगला प्रतिसाद असून ६५ रुपयांपासून १२५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. सुवासिक तुकडा ४५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. तुकडा तांदळासाठी वाढती मागणी आहे.
भाववाढीची काय कारणे?
वन्यप्राण्यांचा उपद्रव, मजुरांची कमतरता, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट, खर्चापेक्षा उत्पन्न मिळत नसल्यामुळे लागवडीचे प्रमाण कमी झाली आहे. आवक कमी व मागणी जास्त त्यामुळे दरात वाढ होत आहे.
नव्या पिकाची प्रतीक्षा
शेतकऱ्यांनी भात लागवड केली असून, पाऊसही चांगला असल्याने पीक समाधानकारक आहे. नवीन पिकाची कापणी ऑक्टोबर पासून सुरू होईल तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदा किती राहणार भाव?
सन २०२४ मध्ये शेतकऱ्यांना भातासाठी प्रति क्विंटल २३८७ रुपये दर मिळाला होता. दरवर्षी दरात वाढ होत असल्याने यावर्षीही दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. शासनाने हमीभाव दरात भरघोस वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
उत्पादन खर्च वाढला, शेतकऱ्यांचा नफा घटला
वाढता इंधन खर्च, खते, कीटकनाशकांचे दरात वाढ, मजुरीतील वाढ यामुळे भाताचा उत्पादन खर्च वाढला आहे.
अधिक वाचा: Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल