करमाळा : करमाळा तालुक्यातील केळी थेट प्रयागराज येथील कुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहेत. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
केळीला मागणी वाढताच दरातही तेजी आली आहे. गेल्या दोन महिन्यांत केळीचे दर गडगडले असले तरी सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल २००० ते २१०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
नोव्हेंबरपासून केळीचे दर गडगडले होते. प्रतिक्विंटल ८०० रुपयांपर्यंत केळीला दर मिळत होता. त्यामुळे सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. सध्या केळीला चांगला दर मिळू लागला असून जानेवारी महिन्यापासून केळीला मागणीही वाढली आहे.
करमाळा तालुक्यात उजनी जलाशय काठावरील पश्चिम भाग व तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेमधील पूर्व भागातील क्षेत्रात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा आहेत.
दरवर्षी तालुक्यात केळीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. तालुक्यातील केळी दर्जेदार असल्याने आखाती देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, अलीकडे रशियामध्ये सुद्धा केळीची निर्यात होऊ लागली आहे.
२१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून दर कमी झाल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत होते.
केळीला मागणी वाढली
प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून लाखो भक्तगण येत आहेत त्यामुळे तेथे केळीला मागणी वाढलेली आहे. पुढील महिन्यात रमजानचे रोजे (उपवास) सुरू होणार असल्याने केळीला आणखी मागणी वाढणार आहे. करमाळा तालुक्यातून प्रयागराज येथे कुंभमेळ्यात केळी विक्रीसाठी गेलेली आहे. मागील महिनाभरापासून चांगला दर मिळत आहे. पुढील काही दिवस मागणी कायम राहणार असल्याने दरही तेजीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या १५-२० दिवसापासून केळीच्या दारात वाढ झालेली असून मालाला २००० ते २१०० रुपये कॅरेटच्या मालाला पंधराशे ते अठराशे रुपये क्विंटलचा भाव मिळत होते. गेल्या महिन्यात थंडीमुळे सिलिंगचा प्रादुर्भाव केळीवर झालेला होता. दरात घसरण झालेली होती. कुंभमेळ्यासारख्या उत्सवात केळीला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरही चांगला मिळू लागला आहे. - राजेंद्र बारकुंड, उत्पादक, चिखलठाण