सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
ओरोस एस.टी. स्टैंड परिसरात 'अस्सल गावठी आठवडा बाजाराचा' शुभारंभ जिल्हाधिकारी तथा प्राधिकरण अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या बाजारामुळे आता नागरिकांना थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय आणि ताजा शेतीमाल उपलब्ध होणार आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, 'सिंधुदुर्गनगरी झपाट्चाने विकसित होत असताना येथे विश्वासार्ह बाजारपेठेची गरज होती.
या उपक्रमामुळे 'शेतकरी ते ग्राहक' अशी थेट विक्री साखळी निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.' या बाजारामुळे नागरिकांना आता ताज्या भाज्या आणि फळांसाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बाजाराची खास वैशिष्ट्ये
• सेंद्रिय शेतीमाल : स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीमाल उपलब्ध.
• थेट विक्री : मध्यस्थांशिवाय विक्री होत असल्याने ग्राहकांना रास्त दर आणि शेतकऱ्यांना अधिक नफा.
• सुविधांचा विस्तार : प्राधिकरण क्षेत्रातील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा प्रशासनाचा मानस.
दर शनिवारी भरणार बाजार
हा विशेष आठवडा बाजार दर शनिवारी सकाळी ७:३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ओरोस एस.टी. स्टैंड परिसरात भरवला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्येक स्टॉलला भेट देऊन शेतीमालाची माहिती घेतली आणि विक्रेत्यांचे कौतुक केले. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, सुप्रिया वालावलकर, प्रभाकर सावंत, पांडुरंग मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
'अस्सल गावठी बाजारामुळे प्राधिकरणाला स्वतःची ओळख लाभली आहे. येणाऱ्या काळात नागरिकांच्या गरजा ओळखून अधिक सुधारणा केल्या जातील.' - तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
हेही वाचा : कोणती फळे, कधी आणि किती खावीत? तसेच काय काळजी घ्याल; जाणून घ्या सविस्तर
