मागील काही दिवसांपासून येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. आवक वाढत असल्यानं दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. राज्यातील इतर बाजार समितीपेक्षा जास्तीचा भाव मिळत असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, कमाल २५०० रुपयांच्या आसपास पोहोचलेला कांदा गुरुवारी २३०० रुपयांवर आला आहे. सर्वसाधारण १००० रुपये दर असलेला कांदा २०० रुपयांवर आला आहे. तर गुरुवारी ६१९ ट्रक कांद्याची आवक झाली होती. किमान दर १००, कमाल २३०० तर सर्वसाधारण २०० एवढा मिळाला. गुरुवारी एकूण १ लाख २३ हजार २१४ पिशव्यांतून ६१ हजार ९५७ क्विंटल कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे.
दरम्यान गुरुवारी ५ कोटी ५७ लाख ६१ हजार ३०० रुपयांची उलाढाल कांद्यातून झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. सध्या बाजार समितीमध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, धाराशिव, लातूर, कर्नाटक राज्यातील विजयपूर, इंडी या भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे. चांगला भाव मिळत असल्याने सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. गाड्यांची संख्या वाढल्याने बाजार समितीत दुपारपर्यंत वाहनांची गर्दी होत आहे.
हेही वाचा : कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर
