आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या सकाळच्या सत्रात बाजारभावात मोठी घसरण झाली.
कांद्याचे सरासरी दर ५०० ते ८०० रुपयांपर्यंत पुकारले जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अकरा वाजेच्या सुमारास घोषणाबाजी करत कांद्याचे लिलाव बंद पाडले. सुमारे सव्वा तासाच्या चर्चेनंतर कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.
लासलगाव येथील मुख्य कांदा लिलाव आवारात सकाळच्या सत्रात एक हजारहून अधिक वाहनांतून अंदाजे २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. लिलाव सुरू होताच कमी दर जाहीर होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले.
कमी बाजार भावामुळे उत्पादन खर्च तर दुरुच मात्र वाहतुक व मजुरीचा खर्चही निघत नसल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत लिलाव बंद पाडले.
घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, उपसभापती ललित दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे, सहायक सचिव प्रकाश कुमावत तसेच लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, बाजार समितीच्या आवारात दाखल झाले.
शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेत समजूत काढल्यानंतर सुमारे सव्वा तासानंतर लिलाव पुन्हा सुरु झाले. दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी लासलगाव बाजार समितीत येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करीत नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मिळणाऱ्या दरातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे. तसेच २५०० ते ३००० रुपये हमीभावाने खरेदी करावी. - किरण उबाळे, कांदा उत्पादक, नांदूर मधमेश्वर.
कालपर्यंत १२०० ते १३०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. होळी व इतर सणांच्या सुट्ट्यांमुळे पुढे चार-पाच दिवस लिलाव बंद राहणार असल्याने मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दरात घसरण झाली. रेल्वे रॅक अधिक उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे, मंत्री गिरीश महाजन व छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे. - डी. के. जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती.
