अलिबाग : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत, मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
भातातील जास्त आर्द्रतेमुळे शेतकरी नाराज असून, त्याचा खरेदीवर प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ चार हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, सोमवारपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामात आधी परतीच्या पावसाने व नंतर अवकाळीने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन किती मिळेल आणि खरेदी किती होईल, याचा निश्चित अंदाज मार्केटिंग फेडरेशनलाही येत नाही. पावसामुळे पिकाची कापणी उशिरा झाली.
आता थंडी वाढल्याने भात सुकवणे कठीण होत आहे. परिणामी भातातील आर्द्रतेचे प्रमाण १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, हे प्रमाण ठरवलेल्या निकषांपेक्षा जास्त असल्याने भातविक्रीत अडथळे येत आहेत.
८० टक्के भात यंदा भिजल्याने सुकवता आलेला नाही. शेतात भात असला तरी तो पात्रतेच्या निकर्षानुसार विकता न आल्याने शेतकरी हताश झाले आहेत. केंद्रे सुरू असूनही भात विकू शकत नाही, हीच सर्वात मोठी अडचण आहे.
कागदपत्रांची पूर्तता
◼️ शासनाच्या किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) भात खरेदीसाठी जिल्ह्यातील विविध संस्थांना केंद्रे चालवण्यासाठी मंजुरीदेखील देण्यात आली आहे.
◼️ प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे मोठे आव्हान ठरत आहे.
◼️ आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक करण्याची केवायसी प्रक्रिया अनेकांनी पूर्ण केलेली नसल्याने अडचणी येते आहेत.
◼️ अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत आहे.
दोन दिवसांत रक्कम जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात
◼️ भात खरेदी करताना सरकारने शेतकरी आणि खरेदीदार संस्था यांना काही अटी घालून दिल्या असून त्यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
◼️ मागील खरीप हंगामात पाच लाख ३० हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आली. यंदा ही सरासरी खरेदी गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे.
◼️ भात खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन दिवसांत खरेदीची रक्कम कोणत्याही परिस्थितीत भात खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील दोन दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
धान्याचा दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यास आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्धी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवीन भात खरेदी करण्यात येईल. - के. बी. ताटे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी
अधिक वाचा: राज्यात थंडीचा मुक्काम वाढला; अजून किती दिवस राहणार थंडीचा कडाका?
