दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट व नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा दरात काहीशी सुधारणा होत आहे. नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव कांदाबाजारात सरासरी १,६८०, तर कमाल २,२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचा कांदा सडला. अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा नुकसानीत विक्री केला. त्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. दिवाळीनंतर समितीमध्ये बाजार कांद्याचा लिलाव सुरू झाल्यानंतर १,१०० ते १२०० रुपये दरम्यान कांद्याला प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत आहे.
मागील वर्षी निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्यामुळे दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यात नाफेड आणि एनसीसीएफचा कांदादेखील शहरी भागात दाखल झाला. यामुळे कांदा दरावर दबावच राहिला.
राज्यातील खरीप कांदा उत्पादनाचा प्रमुख पट्टा असलेल्या नाशिकमध्येही मोठे नुकसान आहे. परिणामी उत्पादनात घट झाल्याची स्थिती आहे. येथील कृषी उत्पन्न बाजरी समितीत उन्हाळ कांद्याची ७८३ वाहनांद्वारे आवक होऊन किमान ७०० कमाल २,२००, तर सरासरी १,६८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
