पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे.
नव्या मार्गामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. तरी हाताळणी कमी झाल्याने दर्जेदार सफरचंद बाजारात उपलब्ध होत आहे. घाऊक बाजारात सध्या दहा किलोला ९०० ते १००० रुपये भाव मिळत आहे.
किरकोळ बाजारात सर्व प्रकारच्या सफरचंदाची दर्जानुसार १६० ते ३२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात देशासह परदेशातून सफरचंद दाखल होत आहेत.
असे आहेत दर (वजन किलोमध्ये)
| सफरचंद | वजन | घाऊक दर |
| काश्मीर | १४ ते १६ | १००० ते १४०० |
| किन्नोर | १० | १६०० ते १८०० |
| अफगाणी | १० | ९०० ते १००० |
अफगाणिस्तानी सफरचंदाचा हंगाम पंधरा दिवस आधीच
सद्यस्थितीत मार्केट यार्ड फळबाजारात दर्जेदार अफगाणी सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. अफगाणिस्तान येथील सफरचंदाचा हंगाम मागील वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधी सुरू झाला आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात ही दहा किलोमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.
अतिवृष्टीचा फटका; दरात १०० ते २०० रुपयांची वाढ
• अफगाणिस्तान येथून सफरचंद इराणमध्ये दाखल होत आहे. त्यानंतर इराण येथून समुद्रमार्गे ती मुंबई येथे व तेथून देशभरात जात आहेत. रस्तेमार्गाने होणारी फळांची हाताळणी कमी झाली आहे. त्यामुळे, सफरचंदाची गुणवत्ता टिकण्यास मदत झाली आहे.
• मात्र, समुद्रामार्गे वाहतूक होत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, गतवर्षी दहा किलोला ८०० ते २०० रुपये मिळणारा दर यंदा २०० ते १ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यात दहा किलो मागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे.
लाल जर्द आणि कोणतीही वॅक्सीन प्रक्रिया केलेली नसल्याने या सफरचंदांना पुणेकरांची अधिक पसंती मिळत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पंधरा दिवस आधीच हंगाम सुरू झाला असला तरी सफरचंदला चांगली मागणी आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात दाखल होत आहेत. - शिवजित झेंडे, फळ आयातदार, मार्केट यार्ड, पुणे.
