बेळंकी : मिरज पूर्व भागातील बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी या भागातील द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी अवकाळी पावसामुळे ५० ते ६० टक्के द्राक्ष बागांना फटका बसून मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसात घडकुज होऊन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी हंगामात ४० टक्केच बागा शिल्लक असल्याने शिल्लक असलेल्या बागांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे, असे द्राक्ष बागायतदारांकडून बोलले जात आहे.
बेळंकी येथील अजित बजरंग जतकर या युवक द्राक्ष बागायतदाराने अवकाळी पावसात द्राक्षबाग जाऊन सुद्धा राहिलेली बाग उत्तमरीत्या पिकवली आहे. त्यांच्या बागेतील द्राक्ष काढणीला सुरुवात झाली आहे.
त्यांच्या बागेतील साडेतीन महिने झालेल्या एसएसएन जातीच्या द्राक्ष पेटीला तब्बल ४४० रुपये दर मिळाला आहे. या हंगामातील बेळंकी परिसरात हा उच्चांकी दर आहे. या बागेतील द्राक्षेनाशिकच्या एका व्यापाऱ्याने एक्सपोर्टसाठी घेतली आहेत.
एकंदरीत जानेवारी अखेर यांच्या बागा विक्रीसाठी येतील, त्यांना समाधानकारक दर मिळण्याची शक्यता आहे, असे द्राक्ष बागायतदारांकडून सांगितले जात आहे.
उच्चांकी दर मिळून सुद्धा समाधान नाही. कारण गेल्या वर्षी याच बागेत २०५ रुपये दर मिळून ३००० पेटी द्राक्षे निघाली होती. परंतु यावर्षी ४४० रुपये दर मिळून केवळ ७०० पेटी द्राक्षे निघाली आहेत. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याने उत्पन्नात घट झाली आहे. हा सर्व अवकाळी पावसाचा परिणाम आहे. - अजित जतकर, युवक द्राक्षबागायतदार, बेळंकी
अधिक वाचा: कांदा पिकातील करपा व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी घ्या ह्या कमी खर्चातील फवारण्या