नाशिक जिल्ह्याच्या देवळा बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कांदा विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांमार्फत अदा न करता बाजार समिती कार्यालयात अदा करण्याच्या बाजार समिती प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून देवळा बाजार समितीत कांद्याची आवक तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढली आहे.
शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे २४ तासांच्या आत देण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाने कांदा व्यापाऱ्यांना देऊनही काही व्यापारी शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे वेलेवर देत नसल्याची बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आली होती. परंतु व्यापाऱ्यांशी असलेले हितसंबंध जपण्यासाठी शेतकरी बाजार समितीकडे लेखी तक्रार देत नसल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला वेळेवर पेमेंट न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात अडचण येत होती.
त्यामुळे गतवर्षी बाजार समिती संचालक मंडळ व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक सभापती योगेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन १ जानेवारीपासून व्यापाऱ्यांनी लिलाव झाल्यानंतर खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे बाजार समितीत जमा करावे. बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रीच्या पैशांचे वेळेवर वाटप करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
त्यामुळे शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत रोख पेमेंट मिळण्याचा प्रश्न मार्गी लागून गत साडेचार महिन्यांत बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पैसे वाटपासाठी ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती...
कांदा विक्रीचे पैसे वाटप करण्यासाठी बाजार समिती कार्यालयात बाजार समितीचे संजय जाधव, गोवर्धन आहेर हे दोन कर्मचारी व कांदा व्यापाऱ्यांचे तीन कर्मचारी असे एकूण ५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून त्या दिवशी कांदा विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट वाटप होईपर्यंत कार्यालय सुरू असते.
२०२४ व २०२५ मध्ये बाजार समितीत पहिल्या चार महिन्यांत झालेली कांदा आवक
सन २०२४
जानेवारी - ८६०२६.९५ क्विंटल
फेब्रुवारी - ६८३८४.४० क्विंटल
मार्च - ६२१४३.७० क्विंटल
एप्रिल - मार्केट बंद होते
सन २०२५
जानेवारी - ११८९४५.६० क्विंटल
फेब्रुवारी - ५०५५७.४५ क्विंटल
मार्च - १२०७३७.७० क्विंटल
एप्रिल - ११८६७६.६५ क्विंटल
शेतकऱ्यांना त्यांचे कांदा विक्रीचे पैसे २४ तासांच्या आत देण्यासाठी बाजार समिती प्रशासन प्रतिबद्ध असून तसे नियोजन करण्यात आले आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांच्या पेमेंटबाबत असणाऱ्या तक्रारी आता बंद झाल्या आहेत. - योगेश आहेर, चेअरमन, देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती.