सोलापूर: सध्या सोलापूरबाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. सोमवारी बाजार समितीत २२३ गाड्यांमधून ४५ हजार पिशव्यांची आवक झाली आहे.
पांढऱ्या कांद्याला ३२०० तर लाल कांद्याला २५००चा भाव मिळाल्याची माहिती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात येऊ लागला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे.
आवक वाढल्याने कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. आगामी काळात कांद्याची आवक वाढली तरी देखील कांद्याचे दर तेजीत राहतील, असा अंदाज बाजार समितीतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पावसामुळेही कांद्याचे उत्पादन घटले आहे, ज्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत कांदा कमी येत आहे. कांद्याची मागणी बांगलादेशमध्येही वाढली आहे आणि भविष्यात दरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.
सलग सुट्यांमुळे आवक वाढली
◼️ मागील आठवड्यात दिवाळी सण होता. दिवाळी सणामुळे सलग सुट्या आल्या होत्या, त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहार काही दिवस बंद होते.
◼️ सोमवारी बाजार समितीचे व्यवहार सुरळीत सुरू झाले अन् कांदा बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.
◼️ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातून नवीन कांदा बाजार येतो. त्यामुळे पुढील काही दिवस दर स्थिर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या भागातून येतोय सोलापुरात कांदा
◼️ बाजार समितीमध्ये नवा कांदा हा कर्नाटक राज्यातून येत आहे. याशिवाय लाल कांदा हा अहिल्यानगर, बीड, पुणे, दौंड, शिरूर, उरळी कांचन येथून येत आहे तर पांढरा कांदा म्हसवड व मंगळवेढा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात येत आहे.
◼️ केंद्र सरकारने आता निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. लाल कांद्याच्या २११ तर पांढऱ्या कांद्याच्या १२ ट्रक बाजारात दाखल झाल्या आहेत.
अशी आहे आकडेवारी
एकूण ट्रक आवक - २२३
एकूण पिशव्या आवक - ४४,७३६
कमाल दर - २,५००
किमान दर - १,१००
एकूण उलाढाल - २ कोटी ५२ लाख ५ हजार ३०० रुपये
सलग सुट्यांमुळे सोमवारी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दिसून आली. कर्नाटक, पुणे, अहिल्यानगर, म्हसवड आदी भागातून कांदा सोलापुरात विक्रीसाठी येत आहे. दर चांगला मिळत असल्याने आवक दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील काही दिवस कांद्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. - दिलीप माने, सभापती, बाजार समिती, सोलापूर
अधिक वाचा: राज्यात २१४ साखर कारखान्यांचे ऊस गाळपासाठी अर्ज; किती कारखान्यांना मिळणार परवानगी?
