सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेती औजारे वाटपाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉटरी काढून लाभार्थी निवड करण्यात आले.
नेहरूनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या हस्ते लॉटरी काढण्यात आली. यावेळी कृषी विभागाचे प्रमुख हरिदास हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या साहित्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार तालुका पातळीवर २१ हजार ४४१ अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी तालुका पातळीवर झाली.
मंगळवारी सकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहात लॉटरी काढून लाभार्थी निवडण्यात आले. बीडीओ राजाराम भोंग, कृषी अधिकारी सागर बारवकर, अजय वगरे, महेश पाटील, सूर्यकांत मोहिते, राजश्री कांगरे, लता बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी, तालुक्यातील कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते.
काय काय मिळणार शेतकऱ्यांना...
लॉटरीत लाभार्थी ठरलेल्या शेतकऱ्यांना श्री पिस्टन स्प्रे, पॉवर स्प्रे, नॅपसॅक बॅटरी, नांगर, रोटरी टिलर, पेरणी यंत्र, ब्रश कटर, सोलार इन्सॅक्ट ट्रॅप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी, ताडपत्री, मधुमक्षिका पेटी, पाच एचपी सबमर्सिबल पंप, डिझेल इंजिन, विद्युत पंचसंच आदी साहित्य ५० टक्के अनुदानावर मिळणार आहेत.
लाभार्थ्यांनी तालुका पातळीवर संपर्क साधावा
निवड झालेल्या लाभार्थी यांना या आर्थिक वर्षात खरेदी प्रक्रिया पूर्ण केले नंतरच योजनेचा थेट पद्धतीने लाभ देय राहणार आहे. तरी सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी पंचायत समिती स्तरावर क्षेत्रीय यंत्रणेची समन्वय साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी केले आहे.
अधिक वाचा: आईच्या मदतीने राहुल यांनी दहा गुंठे वांग्यातून मिळवले दीड लाखाचे उत्पन्न