कोल्हापूर : कोल्हापूरी गुळाची चवच न्यारी राहिल्याने देशासह परदेशातील ग्राहकांनाही भुरळ पाडली पण, साखर भेसळीचे प्रमाण वाढू लागल्याने गूळ पांढरा शुभ्र दिसतो, पण त्याचा टिकाऊपणा कमी झाल्याने 'कोल्हापुरी' गुळाची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे.
बाजारातच पारंपरिक पध्दतीने तयार केलेल्या गुळाला अपेक्षित भाव मिळत नाही आणि खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच जर साखरमिश्रित गुळच अधिक गोड लागत असेल तर शेतकऱ्यांची मानसिकताही बदलत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील कसदार मातीमुळे येथील गुळाला वेगळीच गोडी आहे. जगाच्या पाठीवर कोठेही 'कोल्हापुरी' गूळ पाठवला तर त्याच्या रंग व चवीवर ओळख ठरायची.
पण, अलीकडे रंग आणि चव बदलत गेली, याला सर्वस्वी येथील शेतकरी कारणीभूत आहेत, असे नाही. मागणी तसा पुरवठा हा बाजारपेठेचे सूत्र आहे, त्यानुसार शेतकरी पुरवठा करत आहेत.
कर्नाटकात बारा महिने गुळाची निर्मिती केली जाते. त्यांच्या साखरमिश्रित गुळाच्या स्पर्धेत 'कोल्हापुरी' गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांनाही साखर मिश्रित गुळाची सवय लागली आहे.
तीन टनांत एक आदनाचे दिवस संपले
◼️ पूर्वी शंभर टक्के उसाच्या रसापासून गूळ तयार केला जात होता.
◼️ त्यावेळी तीन टन उसाच्या गाळपात एक आदन निघायचे (म्हणजेच साधारणतः २५० ते ३०० किलो गूळ)
◼️ पण, आता ते दिवस संपले आहेत. एक बॅरल उसाच्या रसात ३०० किलो साखर मिसळली की ४०० किलो गूळ मिळतो.
कारखान्यांच्या स्पर्धेने ऊस मिळेना
◼️ साखर कारखान्यांमध्ये ऊस दराच्या पहिल्या उचलीवरून स्पर्धा सुरू झाली आहे.
◼️ सरासरी प्रतिटन ३५०० रुपयांनी उसाची खरेदी सुरू आहे.
◼️ त्यामुळे गुऱ्हाळघरांना पन्नास रुपये जादा दर देऊन ऊस घ्यावा लागत आहे.
◼️ गुऱ्हाळघरांसाठी कुशल मनुष्यबळ हा प्रश्न देखील गंभीर बनल्याने अडचणी वाढत आहेत.
साखरमिश्रित गुळाने कोल्हापूरची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक साखरमिश्रित गूळ काढणे शेतकऱ्यांना परवडत नाही. पण, व्यापाऱ्यांकडूनच जर मागणी असेल तर शेतकरी तरी काय करणार? - शिवाजी पाटील, शेतकरी, कोपार्डे
अधिक वाचा: १० वर्षांपासून डाळिंबाची युरोपला निर्यात; बिदालचा 'हा' शेतकरी एका हंगामात घेतोय ९५ लाखांचे उत्पन्न
