राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली, तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान दोन आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर याचा अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठीचा शासन निर्णय जारी करण्यात येईल.
त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. त्यासाठी दिवाळीनंतरच मुहूर्त उजाडेल, अशी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कागदावर उतरेल की नाही, असा प्रश्न आहे. शक्यता
दरम्यान या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी आता ॲग्रीस्टॅक अहवालाची मदत घेऊ, असे सांगितल्याने शेतकरी ओळख क्रमांक असलेल्यांनाच मदत मिळेल. त्यामुळे क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अद्यापही शेतांमध्ये पाणी साचून
• सप्टेंबरमधील बाधित क्षेत्राच्या पंचनामांचे काम काही जिल्ह्यात सुरू झाले आहे. मात्र, सोलापूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही शेतांमध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे या ठिकाणी पंचनामे करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही.
• सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजूनही पाणी साचून असल्याने पंचनाम्यांसाठी किमान एक ते दोन दिवसांची वाट बघावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
• सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये सुमारे २ ४ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे. हा अहवाल ८ ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर महिन्याचे पंचनामे शेवटच्या टप्प्यात आले असून, या आठवड्यात पंचनामे पूर्ण होऊन मदत निधी जाहीर करण्यात येईल. दिवाळीपूर्वी सर्व शेतक-यांच्या खात्यावर नुकसानीचा निधी वितरित करण्यात येईल. - दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.
६६ लाख हेक्टर !
• राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे २७जिल्ह्यांमधील तब्बल ३९ लाख ३४ हजार ४६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
• त्यात बीड जिल्ह्यात ६ लाख २२ हजार २९९ हेक्टर, त्या खालोखाल अहिल्यानगरमध्ये ५ लाख ६५ हजार ३२ हेक्टर, संभाजीनगर जिल्ह्यात ५ लाख ८ हजार ६८८, सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार ६३४ तर जालना जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार ९७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
• तत्पूर्वी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात २७ लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे चारही महिन्यांमध्ये एकूण नुकसानीचा आकडा आता ६६ लाख ५६ हजार हेक्टर इतका झाला आहे.
मदत मिळेल की नाही?
ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंद केलेली नाही अशांना हा ओळख क्रमांक मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
१५ ऑक्टोबरनंतरच !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीपूर्वी मदत देऊ, असे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षात शासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ ते २० ऑक्टोबरचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.