सोलापूर : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर बिहारमधील पाटणा तर महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संभाजी नगरला कांदा व अद्रक प्रक्रिया तर सांगली जिल्ह्यातील बेदाना प्रक्रिया उद्योगाने महाराष्ट्राने भारतातील सर्वच जिल्ह्यांना शेती उत्पादित मालावरील प्रक्रिया उद्योगात मागे टाकले आहे. सोलापूर जिल्हा हा मिलेटमध्ये राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.
केंद्र सरकारने शेती उत्पादित धान्यांवर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीला प्राधान्य देत अनुदान तत्त्वावर कर्ज योजना सुरू केली.
२०२० मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाने दोन वर्षांनंतर वेग घेतला. देशभरात राबविल्या जात असलेल्या प्रक्रिया उद्योग उभारणीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
जसा देशात महाराष्ट्र प्रक्रिया उद्योग उभारणीत नंबर १ आहे तसा छत्रपती संभाजीनगर जिल्हाही देशातील सर्वच जिल्ह्यांत पहिल्या क्रमांकावर आहे. संभाजीनगर जिल्ह्यात कांदा व अद्रकवर प्रक्रिया केली जाते.
कांदा प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा एका कंपनीसोबत करार केला असून कांदा व प्रक्रिया उत्पादित माल ही कंपनी खरेदी करते. आता अहिल्यानगर जिल्ह्यातही कांदा प्रक्रिया उद्योगाने वेग घेतला आहे.
देशात महाराष्ट्र प्रथम स्थानी१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया २३ हजार १६३ शेती उद्योग उभारून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.२) बिहार २३ हजार ११ उद्योग उभारून देशात दुसरा, उत्तर प्रदेश १६ हजार २९६ प्रक्रिया उद्योग उभारणी करून देशात तिसरा, १५ हजार १८७ उद्योग प्रक्रिया उद्योगामुळे तामिळनाडू देशात चौथ्या तर ९ हजार १९० प्रक्रिया उद्योग उभारणीतून मध्य प्रदेश पाचव्या क्रमांकावर असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.३) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पालेभाज्या व कांदा प्रक्रिया उद्योगाला चांगलीच बळकटी मिळाली आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २,१२७ प्रक्रिया उद्योग मंजूर झाले आहेत.४) बिहारमधील पाटणा जिल्हात एक हजार ९३९, महाराष्ट्रातील सांगली जिल्हा एक हजार ८८४, अहिल्यानगर एक हजार ६५१ तर हिमाचल प्रदेशातील सिमला जिल्हा एक हजार ५६८ उद्योग मंजूर झाले आहेत.
फळावरील प्रक्रिया उद्योगावर भर सोलापूर जिल्हात आतापर्यंत ९८० च्या जवळपास प्रस्ताव मंजूर झाले त्यामध्ये विविध फळावरील प्रक्रियेचे (बेदाणा प्रामुख्याने) ३६०, ज्वारी-बाजरीवरील प्रक्रियेचे मिलेट उद्योग १७० इतके आहेत. दुधावर आधारित उत्पादनाचे २० इतके प्रकल्प मंजूर झाले तर तृणधान्य उत्पादनाचे ७५, मसाल्याचे ६६, पशुखाद्याचे ६५ उद्योग मंजूर झाले असून इतरही उद्योगासह यातील काही प्रकल्प सोडले तर बहुतेक उद्योग सुरुही झाले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
राज्यात शेती उत्पादित मालावरील प्रक्रिया उद्योगाने २२ हजाराचा आकडा पार केला आहे. या तीन-चार दिवसात त्यात वाढ झाली असेल. राज्यभरात बँकांनी मार्च अखेरला प्रकरणे मंजूर केली आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात आणखीन वाढ होईल. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन पुणे
अधिक वाचा: भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय