गोपाल लाजूरकर
अन्नदाता, जगाचा पोशिंदा ही बिरुदावली नावासोबत मिरवणाऱ्या बळीराजाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढणे कोणत्याही सरकारला अद्याप तरी जमले नाही. जमीन कसण्यासाठी कर्ज काढणे अन् पीक निघाल्यावर परतफेड करणे, याच चक्रात तो पिसला गेला. सावकारांच्या व्याजाचे पाश त्याला आवळू लागले.
हेच पाश आवळू नयेत यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मियूर गावच्या शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी चक्क किडनी विकली. हा प्रकार राज्यातील शासन व्यवस्थेला घृणीत करणारा आहे. शेजारच्या जिल्ह्यात घडलेला हा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवेगळा तर नाहीच नाही. जिल्ह्यातही अवैध सावकारांचे जाळे पसरलेले आहे.
उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे उद्योगाला चालना मिळत आहे. शेतीवरच उपजीविका असलेल्या जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात पीक कर्ज घेतो. रब्बी हंगामात निवडक शेतकरी पीक कर्ज घेतात. खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही, असे शेतकरी सावकारांकडून पीक कर्ज घेतात.
सावकारांकडून घेतलेले पीक कर्ज चक्रवाढ व्याजाच्या स्वरूपात असते. अपेक्षेनुसार उत्पादन आले नाही, तर कर्ज थकीत राहते. या कर्जावरील व्याज वाढत जाते. जिल्ह्यातही अवैध सावकारांचे जाळे आहे; पण त्या सावकारांविरोधात तक्रारी केल्या जात नाहीत. अनेकदा तर कारवाई करणारेच त्यांचे पाठीराखे बनतात, हे अनेकदा उघडकीसही आले आहे.
केवळ ७७ जणांकडेच सावकारीचा परवाना
• गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७७ अधिकृत सावकार असल्याची नोंद जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात आहे. हे केवळ नोंदणीकृत सावकार आहेत.
• अवैध सावकारांची संख्या शेकडो असू शकते. अधिकृत सावकारांकडूनही कर्जदार शेतकऱ्यांवर कर्ज भरण्यासाठी दबाव आणला जातो, अशी माहिती आहे. अवैध सावकारांचा आकडा डोळे चक्रावणारा आहे.
कर्जासाठी सावकारांकडून किती टक्के व्याज ?
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडून दोन प्रकारे व्याज आकारले जाते. विनातारण कर्जावर १२ टक्के व्याज, तर तारण कर्जावर ९ टक्के व्याज आकारले जाते. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांसाठी विनातारण १८ टक्के, तर तारण कर्जावर १५ टक्के व्याज आकारले जाते.
सावकारांविरोधात वर्षभरात केवळ ७ तक्रारी
गडचिरोली जिल्ह्यात २०२५ मध्ये सावकारांविरोधात आतापर्यंत केवळ ७ तक्रारी उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी केवळ एका सावकारावर गुन्हा नोंद झाला आहे. त्याची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. उर्वरित सावकारांवर कारवाई का झाली नाही, हे गुलदस्त्यात आहे.
फसवणूक झाल्यास कारवाई काय?
सावकारांकडून फसवणूक झाल्यास व गुन्हा सिद्ध झाल्यास सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम १८(२) अंतर्गत ५ वर्षे कारावास व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होते. तसेच सावकार व तक्रारदाराने खोटे विधान केल्यासही त्यांच्यावर कारवाईची तरतूद आहे.
तक्रारी ऐकून घ्यायला उपनिबंधकांना वेळ नाही
• गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच वर्षांत अवैध सावकारीची अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. उपनिबंधक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे सावकारांशी असल्याचेही स्पष्ट झाले होते. अवैध सावकारीची मुळेपाळे जिल्ह्यात असतानाही उपनिबंधक कार्यालयाकडून ठोस कारवाई केली जात नाही.
• एखादा शेतकरी, सामान्य तक्रारदार गा-हाणी मांडायला जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गेला तर उपनिबंधक हे त्याची समस्या, तक्रार ऐकून घेत नाहीत. बुधवार, १७ डिसेंबर रोजी असाच प्रकार उघडकीस आला. प्रभारी जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांना भेटायला आलेल्यांना ताटकळत राहावे लागले. उपनिबंधकांनी भेटण्यास नकार दिल्याचे दिसून आले.
