पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, आम्हाला या प्रकल्पासाठी जमीन द्यायचीच नाही.
आमच्या काळ्या आईचा लिलाव कसा करणार, असा सवाल करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपला विरोध कायम ठेवला.
त्याच वेळी शनिवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाधित शेतकऱ्यांची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी बोलत होते.
सात गावांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि उदाचीवाडीचे बाधित शेतकरी संतोष हगवणे, एखतपूरचे उपसरपंच, तुषार झुरंगे, वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर आर्दीनी भूमिका मांडली.
आमची जमीन द्यायची नाही. काळ्या आईचा लिलाव कसा करायचा? तुम्ही जबरदस्तीने ती घेण्याचा प्रयत्न का करत आहात, असा सवाल हगवणे यांनी उपस्थित केला.
आम्ही आंदोलनात सहभागी होतो. गावातील महिलांच्या अंगावर काही कर्मचारी चालून आले. आम्ही शेतकरी भाबडे आहोत. आमच्या भावना समजून घ्या.
आमच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तो चुकीचा आहे. आम्ही दगडफेक केलीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाला विरोध आहे.
आमच्या जमिनी घेण्याबाबत कोणतीही चर्चा करण्यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले, त्यावर चर्चा करा. गुन्हे दाखल कशासाठी केले जात आहेत. त्यांच्यातर गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी एखतपूरचे उपसरपंच तुषार झुरंगे यांनी केली.
महसूलमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मोबदल्यासंदर्भातील पर्याय देण्याबाबत सर्व सात गावांमधील शेतकऱ्यांची चर्चा करू, असे झुरंगे यांनी स्पस्ष्ट केले.
संतोष हगवणे म्हणाले, आम्हाला विमानतळासाठी जागा द्यायची नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. तसेच सात गाव हे आता एक परिवार झाले आहेत.
अधिक वाचा: राज्यात जलसंधारण महामंडळाकडून केली जाणारी ही कामे होणार रद्द; मुख्यमंत्र्यांचे आदेश