Join us

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:27 IST

सोलापूर जिल्ह्यात या ९ उपसा सिंचन योजनेशिवाय अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी देगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे

सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे तर जिल्ह्यातील तब्बल ९ उपसा सिंचन योजनेच्या कामांसाठी ४८९ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात तसेच पूर्णत्वाकडे आलेल्या व जून अखेरपर्यंत पूर्ण होणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी १५ कोटी रुपये नाबार्डने दिले आहेत.

सांगोला, मंगळवेढा व बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेती पूर्णतः उजनी धरणाच्या पाण्यावर बागायती झाली आहे.

करमाळा तालुक्यात काही क्षेत्र कुकडी, माळशिरस तालुक्यात वीर भाटघर, निरा देवधर, उजनी तर सांगोला तालुक्यात वीर भाटघर, म्हैसाळ, टेंभूच्या पाण्याचा शेतीला फायदा होत आहे.

याशिवाय कोरड्या-बोडक्या माळरानासाठी तब्बल ९ उपसा सिंचन योजनांची कामे सुरू आहेत. १९९७ पासून बार्शी व शिरापूर उपसा सिंचन योजनेची कामे सुरू आहेत.

त्यापैकी शिरापूर उपसा सिंचन योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, असे उप कार्यकारी अभियंता बाबासाहेब जाधव यांनी सांगितले.

समाविष्ट उपसा सिंचन योजनाअक्कलकोट व दक्षिण तालुक्यासाठी एकरुख उपसा सिंचन योजना, उत्तर सोलापूर तालुक्यासाठी शिरापूर, बार्शी तालुक्यातील शेतीसाठी बार्शी उपसा सिंचन योजना, मोहोळसाठी आष्टी उपसा सिंचन, सांगोल्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन, करमाळ्यासाठी दहिगाव उपसा, माढा तालुक्यासाठी सीना-माढा व मंगळवेढ्यातील जमिनीसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनांची कामे सुरू आहेत. या आठ योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ४८९ कोटी ५ लाख रुपयांची तर शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी नाबार्डने १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. या मार्चपर्यंत त्यातील ३५ कोटी खर्च होतील व १५ कोटी शिल्लक राहतील असे सांगण्यात आले. याशिवाय नाबार्डने दिलेले १५ कोटी रुपये आहेतच.

शिरापूर योजनेसाठी नाबार्डकडून १५ कोटी रुपये मंजूरशिरापूर उपसा सिंचन योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल. शिरापूर योजनेसाठी नाबार्डकडून १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना लवकरच पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच सांगोला, मंगळवेढा व बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दहावी उपसा सिंचन योजनाजिल्ह्यात या ९ उपसा सिंचन योजनेशिवाय अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी देगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. देगाव जोडकालव्याचे काम पूर्ण झाल्याने आता पूर्ण झालेल्या कालव्यातून उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सांगोल्यासाठीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी ७० कोटी, बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ६९ कोटी ७२ लाख, मंगळवेढा उपसा सिंचनसाठी ५४ कोटी रुपये, आष्टी उपसा सिंचनसाठी ४० कोटी, दहिगाव उपसा सिंचनसाठी २५ कोटी, सीना-माढा साठी २० कोटी तर शिरापूर उपसा सिंचनसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून नियोजनाप्रमाणे कामे होतील. - धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण

अधिक वाचा: काय सांगताय! अवघ्या २९ मिनिटात भिजतेय १ एकर ऊस शेती; काय आहे तंत्रज्ञान? वाचा सविस्तर

टॅग्स :सोलापूरपाटबंधारे प्रकल्पपाणीशेतीशेतकरीराज्य सरकारसरकारउजनी धरणधरणटेंभू धरण