गोपाल मचलकर
वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी केशवराव भगत है आपल्या शेतात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सतत विविध प्रयोग करत असतात. दरम्यान यंदा त्यांनी रब्बी हंगामात आपल्या शेतात मल्चिंग पद्धतीवर वाटाणा हे पीक घेतले आहे.
ऑक्टोबर १५ रोजी त्यांनी एक एकर शेतामध्ये सरीवरंबा तयार करून त्यावर मल्चिंग केले आणि आठ किलो बियाणे टोकनयंत्राद्वारे लागवड केली. सध्या त्याचे उत्पादन सुरू झाले आहे. तर या हिरव्या वाटाण्याची सरासरी ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
भगत यांनी मल्चिंग पद्धतीने घेतलेले वाटाणा पीक चांगले बहरलेले असून त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकरी पाहण्यासाठी येत आहेत. वाटाणा पिकांत 'मल्चिंग'चा वापर परिसरात पहिल्यांदाच होत असल्याने भगत यांचा हा प्रयोग चर्चेचा विषय झाला आहे.
कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
दरवर्षी केशवराव आपल्या १० एकर क्षेत्रात कोबी, शिमला मिरची, काकडी, दुधी भोपळा, मिरची, कारली आणि इतर भाजीपाला पिके घेत असतात. या सर्व कामांचे नियोजन ते स्वतः करतात. याकामी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक पी. एन. उखळकर व मंडल कृषी अधिकारी शिवाजी अंभोरे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.
नवीन प्रयोगाचा आदर्श
गहू, हरभरा यासारखी पारंपरिक पीक न घेता, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केशवराव भगत यांनी वाटाणा पीक घेऊन शेतकऱ्यांसाठी एक आदर्श तयार केला आहे. त्यांना कृषी विभागामार्फत शेततळ्याचा लाभ देखील मिळालेला आहे.
केशवराव भगत आपल्या शेतात एक ते दोन एकराचे पाणलोट तयार करतात. त्या ठिकाणी एक शोष खड्डा घेतात, ज्यामध्ये शेतातील काडीकचरा टाकतात. त्यामुळे पाण्याचा निचरा होतो, आणि शेतातील वाहून जाणारी माती त्या ठिकाणी थांबते. यामुळे पाण्याचे निचरा होतो आणि काडीकचऱ्याचे खत तयार होते. हा अभिनव प्रयोग त्यांच्या शेतात पाहण्यासारखा आहे. - संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम.