जळगाव जिल्ह्याच्या यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
दरम्यान शेतात अचानक आग लागल्याने मोठ्या क्षेत्रातील मका जळून खाक झाली. या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्याने दिल्यानंतर यावल नगरपरिषदेच्या भाजप सदस्य नंदा महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महसूल विभागाने केला पंचनामा
• शेतकऱ्याने सांगितले की, मका पिकासाठी पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खत, औषध फवारणी, मजुरी व सिंचन यावर सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च झाला होता.
• काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक जळाल्याने संपूर्ण गुंतवणूक वाया गेली आहे. दरम्यान, या घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
