करमाळा : उजनी धरणातीलपाणी पातळी कमालीची खालावल्याने धरण पाणलोट क्षेत्र काठावर असलेल्या शेतकऱ्यांची ऊस व केळी पिके संकटात सापडली आहेत.
पिके जगविण्यासाठी धरण पात्रात खोलवर चारी खोदून पाण्याच्या पाइपलाइन, वीज केबल वाढवून मोटारीने पाणी खेचून घेण्याची कसरत दररोज शेतकरी करत आहेत.
गेल्या महिन्यापासूनच उजनी धरण मायनस पातळीत गेलेले आहे. त्यामुळे पाणी उपसा करून शेतीला देणे कष्टाचे झाले आहे. उजनी धरण काठावर ऊस व केळीचे तब्बल ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे.
या पिकांना पाणी अधिक लागते, पण धरणातील पाणी पातळी कमालीची खालावल्याने शेतकरी धास्तावला आहे. मे अखेरीस तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे सरकला आहे त्यामुळे पिकांना पाणी अधिक लागत आहे.
तर दुसरीकडे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने उजनीतील पाणी पातळी आणखी खालावत आहे. त्यामुळे पिके जगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
धरण क्षेत्रात ३० गावांचा समावेश
उजनी धरण पाणलोट क्षेत्राच्च्या कडेला करमाळा तालुक्यातील कंदर, वांगी, चिकलठाण, कुगाव, वाशिंबे, सोगाव, पारेवाडी, कोंढार चिंचोली, टाकळी, कात्रज, खातगाच, गोयेगाव, पोमलवाडी, हिंगणी, मांजरगाव, जिंती, भिलारवाडी, रामवाडी, दहिगाव आदी ३० गावांचा समावेश आहे.
उजनी धरणातील पाणी पातळी कमालीची खालावल्याने पाणी उपसा करताना अडचणी येत आहेत. चारी खोदून पाइप व विजेच्या केबल वाढवून विद्युत मोटारी खाली नेऊन चारीतील पाणी उपसून पिके जगवत आहोत. - विकास गलांडे, चेअरमन सोसायटी चिखलठाण
अधिक वाचा: 'पीएम किसान' योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण हे कराल तरच मिळतील पैसे