करमाळा : इच्छाशक्ती असली की सारं काही साध्य करता येतं. या उक्तीप्रमाणे वांगीच्या (ता. करमाळा) दोघा चुलत भावांनी एकत्र येत दुसऱ्याचे शेत वाट्याने घेतले.
दोन महिन्यांच्या कालावधीत अडीच एकर क्षेत्रामध्ये १२ लाख रुपयांच्या खरबुज पिकाचे उत्पादन घेतले. चौधरी बंधूंचा खरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे. वांगी नं. २ येथे हा यशस्वी प्रयोग पाहावयास मिळत आहे.
येथील अमोल चौधरी व दत्तात्रय चौधरी हे दोन चुलत बंधूनी आपले चुलते बळीराम चौधरी यांना तुमचे अडीच एकर क्षेत्र आम्हाला वाट्याने द्या, या आम्ही बदल्यात उत्पन्नातील चौथा हिस्सा तुम्हाला देऊ, असे सांगितले. त्यांनीही ते मान्य केले.
शेतीसाठी आवश्यक जमीन, पाणी, भांडवल मार्गदर्शन जवळ नसतानाही जिद्द, चिकाटी आणि कष्ट याच्या जोरावर खरबूज शेतीचा त्यांनी केलेला यशस्वी प्रयोग या परिसरातील इतर तरुण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शन
◼️ दोघांनी या अडीच एकर क्षेत्रावर मल्चिंगचा वापर करत खरबुजाची रोपे आणून लागवड केली.
◼️ यासाठी पिंपळखुटे येथील शेतकरी विठ्ठल नवगिरे यांचे मार्गदर्शन व गावातील नितीन तकीक यांचे सहकार्य मिळाले.
◼️ दोन महिन्यात उत्तम खत, पाणी व्यवस्थापन करत रात्रंदिवस या शेतामध्ये कष्ट करून जोमदार असे खरबुजाचे पीक उभे केले.
१ लाख उत्पन्न अपेक्षित
सध्या अडीच एकर क्षेत्रामध्ये ५० टन उत्पादन पहिल्या तोड्याला निघाले असून, २२ रुपयांचा दर ठरवून ११ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे, तर शिल्लक राहिलेल्या खरबुजांपासून एक लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
