हेमंत आवारी
अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील आदिवासी भागातील डोंगरदरीच्या भात रानात तसेच प्रवरा, मुळा, आढळेच्या पाणथळ सखल शेतीत काळभात, आंबेमोहर, दप्तरी, जिरवेल, कोळपी, ढवळ या पारंपरिक भात वाणांबरोबरच इंद्रायणी, १००८ दाणेदार ओंब्यांनी बहरले आहे.
या भाताचा सुवास आसमंतात दरवळला आहे. दुर्मीळ काळी साळ (काळभात) बहरली असून पारंपरिक भात वाण जतन करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम लोकपंचायत एक तपापासून करत आहे.
या भाताचे उत्पादन कमी असल्यामुळे बहुतेक शेतकरी दप्तरी, इंद्रायणी आणि १००८ या वाणांची लागवड करतात.
असे असले तरी गंगाराम धिंदळे, दत्तू धिंदळे, राजू धराडे, चंद्रकांत बांगर, तुकाराम खाडे हे शेतकरी काळ भात लागवड करून चांगले उत्पादन व उत्पन्न घेत आहे. तालुक्यातील आदिवासी भागात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
मुळा खोऱ्यातील धामणवन, शिरपुंजे, लव्हाळी, पाचनई, पेठ्याची वाडी, कोथळे, कोहणे, लव्हाळी, ओतूर, कोतूळ, फोफसंडी या भागातील शेतकरी लोकपंचायतच्या मार्गदर्शनाखाली या पारंपरिक वाणाचे संवर्धन करत आहेत.
या वाणाची लागवड शक्यतो घरी खाण्यासाठीच येथील शेतकरी करत असल्याने बाजारात हा वाण फारसा विक्रीस उपलब्ध होत नाही. पर्यटक आवर्जून या तांदळाची मागणी करतात.
या भाताचे पीक सध्या शेतात उभे असून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. या काळभाताला बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव मिळू लागल्याने शेतकरीही त्याकडे आकर्षित झाला आहे.
लोकपंचायत दहा वर्षांपासून काळभाताच्या संवर्धनासाठी काम करत आहे. सुरुवातीला १८ शेतकरी काळभात करायचे. बियाणे शुद्ध नव्हते. त्यासाठी निवड पद्धतीने बीज प्लॉट घेतले. नंतर काळभाताचे क्षेत्र वाढवले आहे. सध्या काळभात पिकविणारे दीडशेहून अधिक शेतकरी लोकपंचायतच्या संपर्कात आहेत. याची विक्री बळीराजा उत्पादक कंपनीच्या माध्यमातून होते. - विजय सांबरे, लोकपंचायत
अधिक वाचा: तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर