वस्तू आणि सेवा करात GST अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांपैकी कृषी यंत्रसामग्रीसाठी झालेल्या सुधारणांची चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.
ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण संघटना (टीएमए), कृषी यंत्रसामग्री उत्पादक संघटना (एएमएमए), अखिल भारतीय एकत्रित उत्पादक संघटना (एआयसीएमए) तसेच भारतीय पॉवर टिलर संघटना (पीटीएआय) यांच्या प्रतिनिधींसह इतर अनेकांनी या बैठकीत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने भाग घेतला.
या बैठकीनंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री चौहान यांनी जीएसटी दरांमध्ये कपात केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि बैठकीतील चर्चेचे तपशील उपस्थितांना सांगितले.
कृषी यंत्रसामग्रीवर आधी १२% आणि १८% जीएसटी होता तो आता कमी करून ५% करण्यात आला असून येत्या सोमवारपासून म्हणजेच २२ सप्टेंबर पासून नवा दर लागू होणार आहे. शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळेल असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, या बैठकीदरम्यान यंत्रे उत्पादक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींना असे निर्देश देण्यात आले आहेत की २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी दरांच्या कपातीचा थेट लाभ संपूर्ण पारदर्शकतेसह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.
कोणती औजारे किती रुपयांनी स्वस्त होणार?
35 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 41,000 रुपयांनी स्वस्त होईल.
45 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 45,000 रुपयांनी स्वस्त होईल.
50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 53,000 रुपयांनी स्वस्त होईल.
75 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 63,000 रुपयांनी स्वस्त होईल.
विद्युत तणनाशक यंत्र (7.5 अश्वशक्ती): ₹5,495 ने स्वस्त
मालवाहू वाहन ट्रेलर (5-टन क्षमता): ₹10,500 ने स्वस्त
बी पेरणी आणि खत यंत्र (11 फाळ): ₹3,220 ने स्वस्त
बी पेरणी आणि खत यंत्र (13 फाळ): ₹4,375 ने स्वस्त
मळणी कापणी पट्टी यंत्र (14 फूट): ₹1,87,500 ने स्वस्त
पेंढा संकलक यंत्र (5 फूट): ₹21,875 ने स्वस्त
सुपर सीडर (8 फूट): ₹16,875 ने स्वस्त
हॅपी सीडर (10 फाळ): ₹10,625 ने स्वस्त
फिरता नांगर (6 फूट): ₹7,812 ने स्वस्त
चौकोनी गाठणी यंत्र (6 फूट): ₹93,750 ने स्वस्त
मल्चर (8 फूट): ₹11,562 ने स्वस्त
हवेच्या दाबा आधारे चालणारे पेरणी यंत्र (4-रांगा): ₹32,812 ने स्वस्त
ट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र (400-लिटर क्षमता): ₹9,375 ने स्वस्त
अगदी बागकामासाठी तसेच बेणणीसाठी वापरले जाणारे छोटे ट्रॅक्टर्स देखील आता स्वस्त होतील. चार रांगांचे भात लावणी यंत्र आता १५,००० रुपयांनी स्वस्त होईल.
विविध पिकांसाठी वापरले जाणारे प्रती तास ४ टनांचे मळणी यंत्र १४,००० रुपयांनी स्वस्त होणार आहे. १३ अश्वशक्तीच्या पॉवर टिलरची किंमत देखील ११,८७५ रुपयांनी कमी होईल.
शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने सरकार या लाभांविषयीची माहिती अनेकविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता यामुळे कस्टम हायरिंग सेंटर्सना (उपकरणे भाड्यावर देणारी केंद्र) कमी किमतीत यंत्रसामग्री मिळू शकेल. यामुळे त्यांनीही शेतकऱ्यांना परवडण्याच्या दृष्टीने भाड्याचे दर कमी करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
रब्बी पिकांसाठी येत्या ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यापासून वस्तू आणि सेवा कर दर कपातीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी या लाभांचा आधुनिक शेतीसाठी योग्यरित्या उपयोग करून घेऊ शकतील असे ते म्हणाले.
कृषी यांत्रिकीकरणाला बळकटी देण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील, त्यादृष्टीने भविष्यात योजना तयार करताना उत्पादक संघटनांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीनंतर, चौहान यांनी उपस्थितांसोबत वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम करण्याच्या केंद्र सरकारचा संकल्पही पुन्हा एकदा व्यक्त केला.
वस्तू आणि सेवा कर दरांमध्ये कपात केल्यानंतर, कृषी क्षेत्राशी संबंधित उपकरणांच्या नवीन किमतीविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.