बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात शुक्रवारपासून (दि. १६) कारखान्यात गळीतास येणाऱ्या उसाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
यात आडसाली, सुरू, पूर्व हंगामी व खोडवा या उसाला सरसकट १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाचे बैठकीत घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
यापूर्वी कारखान्याने १ जानेवारीपासून गळीतास येणाऱ्या सुरु, पूर्व हंगामी उसास प्रतिटन ७५ रुपये प्रमाणे व खोडव्यास प्रतिटन १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले होते.
मात्र कार्यक्षेत्रात आडसाली उसाचे क्षेत्र जास्त असल्याने सभासदांच्या ऊस तोडीस होणारा विलंब व त्यामुळे सभासदांचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेऊन अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात १६ जानेवारीपासून कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील गाळपास येणाऱ्या उसास सरसकट प्रतिटन १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे १६ पासून येणाऱ्या उसाला सभासदांना ३२०१ रुपये मिळणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत गळीतास येणाऱ्या आडसाली उसास प्रतिटन ३१०१ रुपये व सुरू, पूर्ण हंगामी उसास प्रतिटन रुपये ३१७६ व खोडव्यास प्रतिटन रुपये ३२०१ रुपये मिळणार आहेत.
साखर उताऱ्यात वाढ
पुढे कारखान्याचे ऊस गाळप व साखर उतारा यामध्ये वाढ झाली, तरच कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर पडेल. सभासदांनी माझा कारखाना माझी जबाबदारी ही जाणीव ठेवून चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे.
२०० रुपये कपात
जळीत ऊस जास्त प्रमाणात येत असल्याने उताऱ्यावर परिणाम होत आहे. १६ जानेवारीपासून जळीत उसास प्रतिटन दोनशे रुपयेप्रमाणे जळीत नुकसान भरपाई कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगितले.
अधिक वाचा: आता लाईट कनेक्शन मिळणार झटपट; ग्रामीण भागात किती दिवसांत मिळणार नवीन कनेक्शन?
