Join us

रानभाज्यांमध्ये सर्वात महागडी आणि चविष्ट असणारी 'ही' भाजी बाजारात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:00 IST

ran bhaji रानभाज्यांमध्ये सर्वात महागडी आणि चविष्ट असणारी ही फळभाजी बाजारात दाखल झाली आहे. या भाजीला चांगली मागणी आहे.

रानभाज्यांमध्ये सर्वात महागडी आणि चविष्ट असणारी कर्टोली ही फळभाजी बाजारात दाखल झाली आहे. या भाजीला चांगली मागणी असल्यामुळे तिची २४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.

दर सर्वाधिक असूनही ग्राहक भाजी विकत घेत आहेत. ran bhaji kartoli कर्टोली ही रानभाजी असून पावसाळ्याच्या जून आणि जुलैमध्येच ती रानात सापडते.

भात लावणीच्या काळात या वेलीला गर्द हिरव्या रंगाची, नाजूक काट्यांनी झाकलेली फळे उगवतात. ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी समाजाचे लोक रानावनात फिरून ही फळभाजी बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात.

या फळांची भाजी तेल आणि कांद्यावर परतून किंवा चण्याच्या डाळीमध्ये केली जाते. ही भाजी अत्यंत चविष्ट असते तसेच गुणकारीही आहे.

कर्टोली ही रानभाजी मधुमेहावर उपयुक्त ठरते. फक्त पावसाळी हंगामात मिळाल्यामुळे लोक आवर्जूनही भाजी खरेदी करतात. काही दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे रानात कर्टोलीची भाजी मोठ्या प्रमाणात मिळू लागली आहे.

मात्र, या वर्षी ही भाजी काहीशी महाग असून, गेल्या वर्षी २०० रुपये प्रति किलो असलेल्या भाजीचा या वर्षी मात्र दर २४० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

विक्रेत्यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळात भाजी महाग असली तरी पुढील काळात तिचे दर खाली येतील. लांबलेल्या पावसामुळे कॉली भाजी उगवण्यास उशीर झाला; पण दमदार पावसामुळे काही दिवसांपासून कर्टोली रानांत मिळत आहे आणि यामुळे रोजगारही मिळत आहेत. - लक्ष्मी जाधव, विक्रेत्या

अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?

टॅग्स :भाज्याजंगलआरोग्यअन्नपाऊसमोसमी पाऊसशेतकरीबाजारभात