भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाला उसाला राज्यात सर्वाधिक ३,६५३ रुपये मे.टन अंतिम दराची घोषणा केली.
आज शुक्रवार दि.७ पासून गळीत हंगामाला सुरुवात करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील आणि संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, कारखान्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असतानादेखील शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून बाजारभाव, उत्पादन खर्च व साखरेच्या दरांचा विचार करून आम्ही योग्य आणि समाधानकारक असा दर निश्चित केला आहे.
कारखाना वेळेवर सुरू करून शेतकऱ्यांच्या उसाचे लवकर गाळप व्हावे, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आजपासून गळीत हंगामाला सुरुवात करत आहोत.
तसेच गेल्या गळीत हंगामात चार लाख २१ हजार ७८८ मॅट्रिक टन उसाचे गाळप करून पाच लाख ३७ हजार ८७० लाख साखर पोती उत्पादित करीत १२.७५ साखर उतारा मिळविला होता.
त्याआधारे या हंगामात 'भोगावती'ची एफआरपी रक्कम ३,६५२ रुपये ६० पैसे पडत आहे. यामध्ये ४० पैसे वाढ करीत ३,६५३ रुपये अंतिम दर देणार आहोत.
सध्या कारखान्याकडे ८,२०० हेक्टर उसाची नोंद झालेली आहे. चालू गळीत हंगामात सहा लाख मे.टन गाळप उद्दिष्ट ठेवले आहे.
यासाठी कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांनी आपला सर्व ऊस 'भोगावती' शिवाय अन्य कुठल्याही कारखान्याला घालू नये, असे आवाहन करत तोडणी-ओढणी कामगारांची वीस टक्के दरवाढ व कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ देण्याचादेखील निर्णय घेतल्याची माहिती दिली.
सर्व संचालक, कार्यकारी संचालक सागर पाटील, शेती अधिकारी सातापा चरापले, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील, संजय पाटील, विठ्ठल महाडेश्वर, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
'स्वाभिमानी'कडून सत्कार
यावेळी भोगावती साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक ऊस दर दिल्याच्या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विठ्ठल महाडेश्वर यांनी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व संचालक मंडळाचा सत्कार केला.
अधिक वाचा: 'दत्त शिरोळ' साखर कारखाना एफआरपीपेक्षा शंभर रुपये जादा देणार; यंदा प्रतिटन कसा दिला दर?
