अवसरी : पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचे हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार आहे.
कारखान्यामार्फत 'दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०' ही महत्त्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.
दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७, या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
को. व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत.
त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी.
खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसांच्या आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे.
त्यानंतर उशिरा ऊस लागवड नोंद करण्यास आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल.
हुमणी किडीच्या भुंगेऱ्यांची खरेदी
- ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क रक्कम १०० डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.
- एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु. ३०० प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार आहेत.
अधिक वाचा: बागायती, जिरायती व बहुवार्षिक पिकांना हेक्टरी किती मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या सविस्तर