Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाला हानी पोहोचल्याने 'या' साखर कारखान्याला तब्बल १ कोटीचा पर्यावरणीय दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:08 IST

कारखान्यातील मळीच्या टाकीचा स्फोट होऊन घोड नदीपात्रात, तसेच परिसरात दूषित पाणी जाऊन पर्यावरणाला हानी पोहोचली.

श्रीगोंदा : कारखान्यातील मळीच्या टाकीचा स्फोट होऊन घोड नदीपात्रात, तसेच परिसरात दूषित पाणी जाऊन पर्यावरणाला हानी पोहोचली.

यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने येथील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याला १ कोटी ६ लाख ७ हजार ९० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तसेच प्रतिबंधात्मक उपायांसाठी ७५ लाख आणि सुधारणात्मक कामांसाठी ५१ लाख रुपये खर्च करण्याचेही निर्देशही दिले आहेत. त्यामुळे कारखान्याला एकूण २ कोटी ३२ लाख कारखान्याला द्यावे लागणार आहेत.

याबाबत काष्टी येथील सचिन सुदाम पाचपुते यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. पाचपुते यांच्यावतीने अ‍ॅड. तानाजी बी. गंभीरे आणि अ‍ॅड. विजय म्हस्के यांनी युक्तिवाद केला.

लवादासमोर अ‍ॅड. तानाजी गंभीरे यांनी पुराव्यासह सिद्ध केले की, १० फेब्रुवारी २०२२ रोजी कारखान्याच्या मळीच्या टाकीचा स्फोट झाल्यामुळे अंदाजे १० ते १२ हजार मेट्रिक टन मळी सांडली होती.

स्फोटामुळे मळी कारखान्याच्या परिसरातील शेती जमिनीत पसरली आणि जवळच्या नैसर्गिक नाल्यात (माळीचा ओढा), घोड नदीपात्रातही गेली. या स्फोटामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची भिंत कोसळली आणि पर्यावरणासह शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.

या मळीच्या आम्लयुक्त स्वरूपामुळे आणि तापमानामुळे परिसरातील ५ निलगिरीची झाडे जळाली होती. असे मुद्दे लवादाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

सुनावणीच्या दरम्यान कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. संग्रामसिंग आर. भोसले, अ‍ॅड. समृद्धी एस. जैन, अ‍ॅड. नृपाल ए. डिंगणकर, अ‍ॅड. पुष्कर ए. भोसले आणि अ‍ॅड. नमन शेरस्त्रा यांनी बाजू मांडली.

तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अ‍ॅड. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंकडील सुनावणीनंतर न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह व डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने निकाल दिला.

पर्यावरणाच्या नुकसानीप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने नागवडे साखर कारखान्यातील सांडपाणी गळतीमुळे आणि मळीच्या टाकीच्या स्फोटामुळे घोड नदी व परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे ताशेरे ओढले.

न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने कारखान्याला १ कोटी ६ लाख ७ हजार ९० रुपयांचा पर्यावरणीय दंड ठोठावला आहे.

शिवाय प्रतिबंधात्मक उपायांसाठी ७५ लाख आणि सुधारणात्मक कामांसाठी ५१ लाख रुपये खर्च करण्याचेही निर्देशही दिले, असे एकूण २ कोटी ३२ लाख कारखान्याला द्यावे लागणार आहेत.

अधिक वाचा: पीएम किसानचा २२ वा हप्ता आला मात्र नमो शेतकरीचा ९ वा हप्ता कधी? शेतकऱ्यांना प्रतीक्षा

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar factory fined ₹2.32 crore for environmental damage.

Web Summary : A sugar factory in Shrigonda was fined ₹2.32 crore by the National Green Tribunal after a molasses tank explosion caused severe pollution to the Ghod River and surrounding areas. The fine includes compensation for environmental damage, preventative measures, and corrective actions, following a complaint about the extensive damage to the environment and farmland.
टॅग्स :साखर कारखानेऊसपर्यावरणशेतकरीशेतीपाणीप्रदूषणश्रीगोंदानदी