शक्तिपीठ महामार्गाचाच मार्ग बदलण्यात येणार असून, तो सातारा जिल्ह्याच्या माण आणि खटाव तालुक्यांतील जवळपास १६ गावांतून जाणार आहे. याबाबत ऑन रेकॉर्ड काहीही समोर आलेले नसले तरी तशा हालचाली मात्र सुरू आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गारवडमधून हा मार्ग साताऱ्यातील कारखेलमध्ये येणार आहे. पडळनंतर मायणीजवळून सांगली जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गामुळे माणमधील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन तीर्थक्षेत्रेही जोडली जाणार आहेत.
शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून निघणार असून, कोकणातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. हा मार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार होता. सुमारे ८०२ किलोमीटर अंतर होते; पण या महामार्गाला काही सांगली-कोल्हापूरसह जिल्ह्यांत विरोध झाला. त्यामुळे याचा मार्ग बदलण्याचा निर्णय झालेला आहे. शक्तिपीठ महामार्ग पूर्वी सोलापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जाणार होता. तो आता सोलापूरमधून सातारा जिल्ह्यात येणार आहे.
माण तालुक्यातील १० आणि खटावमधील ६ गावांच्या हद्दीतून तो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे.
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
