सांगली : जिल्ह्याचा शेतमालाने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून तब्बल ६४ हजार १४६.४० टन फळे आणि भाजीपाल्याची निर्यात झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आठ हजार ३७७.९२ टनांची भरघोस वाढ नोंदवली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, मका, आंबा, मिरची आणि बेबी कॉर्नसारख्या पिकांनी गल्फ देश, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील बाजारपेठांमध्ये आपली छाप पाडली आहे.
जिल्ह्यातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५५ हजार ७६८.४८ टन केळी, डाळिंब, द्राक्षे, मिरची, मका, आंबा, बेबी कॉर्न, वाटाणा, हळद, भाजीपाल्याची निर्यात केली होती.
जागतिक बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्यामुळे जिल्ह्याच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल आठ हजार ३७७.९२ टनाने निर्यातीत वाढ होऊन ६४ हजार १४६.४० टनांपर्यंत गेली आहे.
जिल्ह्यातून जवळपास एक लाख टनाने शेतीमाल निर्यातीचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जागतिक बाजारपेठेत सांगलीची ख्याती
◼️ सांगलीचा शेतमाल बहरीन, कुवेत, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, दुबई, युरोप, अमेरिका, नेदरलँड, बांगलादेश, थायलंड, केनिया, पोलंड, इटली, चीन आणि मलेशियासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.
◼️ यंदा केळी, डाळिंब, मका, हळद आणि बेबी कॉर्नच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः बेबी कॉर्न आणि वाटाण्याची निर्यात ९५१.६१ टनांवरून थेट ४,६४५ टनांवर पोहोचली, तर हळदीची निर्यात २,७३९.८० टनांवरून ३,९८२ टनांपर्यंत वाढली.
जिल्ह्यातून भाजीपाला, फळांची निर्यात
पीक | २०२३-२४ | २०२४-२५
केळी | ६०.२० (टन) | १३८२ (टन)
मिरची | २०८.८४ | १६७.४०
डाळिंब | ३८४.४० | २,३४२
द्राक्षे | १९,२७० | १८,११२
मका | ३१,०५७.४ | ३२,४२६
आंबा | ५०४.८५ | ५९
वाटाणा | ९५१.६१ | ४,६४५
तांदूळ | ३०६ | ४१९
हळद | २,७३९.८० | ३,९८२
भाजीपाला | २.७८ | १२१
मसाला पिके | २८२.९६ | ४८१
शेतकऱ्यांना चालना, प्रशासनाचे प्रयत्न
◼️ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, शेतमाल निर्यातीसाठी आम्ही सातत्याने प्रोत्साहन देत आहोत. यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, मका, आंबा, मिरची आणि बेबी कॉर्नच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
◼️ शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठीही कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यातीला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत
जागतिक बाजारपेठेत सांगलीची ख्याती
◼️ सांगलीच्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे.
◼️ यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळ मिळाले आहे. निर्यातीतील ही वाढ सांगलीच्या शेती क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर