करमाळा : निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील केळीचा दर्जा व उत्पादन क्षमतावाढीसाठी होऊ घातलेले करमाळा तालुक्यातील केळी संशोधन केंद्र अद्याप कागदावर आहे.
करमाळ्यासह, माळशिरस, माढा, पंढरपूर तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढल्याने केळीचे क्षेत्र वाढले आहे. एकट्या करमाळा तालुक्यात २२,५०० हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जाते.
तर संपूर्ण जिल्ह्यात ३२,७०० हेक्टर क्षेत्र केळीने व्यापले आहे. शेलगाव (वांगी) च्या कोरडवाहू संशोधन केंद्राच्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र उभारणीची मागणी प्रलंबित आहे.
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठ व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात.
उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते. निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून ५,००० कोटीची उलाढाल होत आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यातून १६,००० कंटेनर केळीची निर्यात होऊन २२ हजार कोटीचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले आहे.
देशासाठी ३४,००० कंटेनर निर्यातीचे उद्दिष्ट◼️ यावर्षी देशासाठी ३४,००० कंटेनर निर्यातीचे उद्दिष्ट समोर असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निम्मा वाटा राहणार आहे. देशात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यात केळीचे मोठे उत्पादन होते. परंतु, या ठिकाणी या पिकासाठी ठराविक हंगाम आहे.◼️ महाराष्ट्रातसुद्धा जळगावमध्ये ठराविक हंगामात केळीची लागवड केली जाते. मात्र, सोलापूर जिल्ह्यात केळी पिकासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले कोरडे वातावरण, अनुकूल असलेली नैसर्गिक स्थिती, जमिनीची प्रतवारी यामुळे संपूर्ण वर्षभर केळी लागवड होत असलेला देशातील एकमेव सोलापूर जिल्हा असल्याने केळी निर्यातदारांसाठी संपूर्ण वर्षभर या ठिकाणी केळी उपलब्ध होतात.
जिल्ह्यात निर्यातक्षम केळीचे वाढते क्षेत्र पाहता करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी व शेती विभागाच्या स्व-मालकीच्या तब्बल ८७ एकर शेतजमीन कोरडवाहू संशोधन केंद्र म्हणून उपलब्ध आहे. या जागेत केळी संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. या संशोधन केंद्राद्वारे केळीवरील रोग नियंत्रण, पाणी वापर, जमीन, खते, रोपे आदींवर संशोधन व प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. - धुळाभाऊ कोकरे, केळी उत्पादक शेतकरी
करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्राची गरज आहे, त्याप्रमाणे कृषी विभागासोबत बैठक लावण्यासंदर्भात कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. केळी संशोधन केंद्र तालुक्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - नारायण पाटील, आमदार करमाळा
अधिक वाचा: तुकड्यांतील जमीन नियमित करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन; १५ दिवसांत निर्णय देणार