सोलापूर : मागील वर्षी गाळपाला आणलेल्या उसाचे यावर्षीचा गाळप हंगाम सुरू होत असताना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ३३ कोटी २३ लाख रुपये दिले नाहीत.
वर्षभर शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या साखर कारखानदारांवर प्रशासन काहीच करू शकले नसल्याने आपले काहीही नुकसान होत नसल्याची कारखानदारांची धारणा झाली आहे.
मागील वर्षी १५ ऑक्टोबरपासून राज्यात साखर हंगाम सुरू झाला होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यात गोकुळ व काही कारखान्यांनी आठ दिवस अगोदरच ऊस तोडणी सुरू केली होती.
साखर हंगाम संपवून जानेवारी अखेरपासून कारखाने बंद होऊ लागले. ऊस संपल्याने कारखाने बंद झाले. साखर विक्री करून कारखानदार तेव्हाच मोकळे झाले.
मात्र, शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे बऱ्याच कारखान्यांनी वेळेत दिले नाहीत. कोणी वेळेत, कोणी सहा महिन्यांत, तर काहींनी मागील महिन्यापर्यंत ऊसउत्पादकांचे पैसे दिले.
मात्र, पाच साखर कारखान्यांनी सप्टेंबरअखेरपर्यंत ३३ कोटी २३ लाख रुपये दिले नसल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले..
१) सिद्धेश्वर साखर कारखाना - १८ कोटी एक लाख.
२) जयहिंद शुगर - सहा कोटी १२ लाख.
३) मातोश्री लक्ष्मी शुगर - ५ कोटी ३८ लाख.
४) गोकुळ शुगर - २ कोटी.
५) सिद्धनाथ शुगर तिऱ्हे - १ कोटी ७५ लाख.
वरील पाच कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांचे दिले नसल्याचे सांगण्यात आले. आता गाळप परवाना घेण्यासाठी मागचे देणे चुकते करावे लागणार आहे किंवा न देताही दिल्याचे कागदोपत्री दाखवावे लागणार आहे.
अधिक वाचा: तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर