सोलापूर : 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेअंतर्गत ६० दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप पुरवठादार कंपनीला आस्थापित करणे बंधनकारक आहे.
मात्र, अर्ज केल्यानंतरही वर्षानुवर्षे सौरपंप कार्यान्वित केले जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. एवढेच काय यंदाच्या हंगामातील ऐन रब्बी हंगामात हजारो शेतकऱ्यांना सौरपंप मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना शासनाने आणली आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच दिला जातो.
अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के भरून संच दिला जातो. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचा पंप बसतिला जातो.
कशी आहे प्रक्रिया? कसा करायचा अर्ज?
◼️ या योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचा.
◼️ अर्ज मंजूर झाल्यानंतर सर्वेक्षण होते.
◼️ सर्वेक्षण रिपोर्ट आल्यानंतर त्याला मंजुरी मिळते.
◼️ त्यानंतर पुरवठादार नियुक्त करावा लागतो.
◼️ त्यानंतर कंपनीचे लोक शेतात येऊन सौरपंप कार्यान्वित करतात.
किती एचपीसाठी किती पैसे भरावे लागतात?
◼️ ७ एचपी पंपसाठी - ४५००० रु.
◼️ ५ एचपी पंपसाठी - ३२५०० रु.
◼️ ३ एचपी पंपसाठी - २२००० रु.
पुरवठादार नियुक्त करताना उडतोय गोंधळ
◼️ अर्ज केल्यानंतर पुरवठादार नियुक्त करावा लागतो.
◼️ मात्र, पुरवठादार नियुक्त करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
◼️ रात्री-अपरात्री मेसेज येतो, मेसेज बघेपर्यंत त्या पुरवठादाराचा कोटा संपतो, त्यानंतर पुढील संदेशाची वाट पाहावी लागते.
पुरवठादारांकडून शेतकऱ्यांना त्रास
◼️ एकीकडे वेळेवर सौरपंप बसविला जात नसल्याने हैराण असलेल्या शेतकऱ्यांना पुरवठादारांकडून सातत्याने त्रास दिला जात आहे.
◼️ वास्तविक पाहता सौरपंप कार्यान्वित करताना वीट, वाळू, सिमेंट व अन्य साहित्य आणण्याची जबाबदारी पुरवठादाराची असताना ते शेतकऱ्यांना आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
मी मागील वर्षी सौरपंपासाठी अर्ज केला. पुरवठादार पसंत करण्यास काही महिने गेले. पुरवठादार पसंत केल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी माझ्या शेतात पंप बसविण्यात आला. ६० दिवसांत सौरपंप बसविणे बंधनकारक असताना ते होताना कोठेही दिसत नाही. - महादेव कुंभार, शेतकरी
काहींच्या शेतात वर्षानंतर पंप बसविला जात आहे, तर काहींना दोन ते तीन महिन्यांत बसविला जात आहे. अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रियेविषयी कोठे संपर्क साधायचा याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. महावितरणचा कारभार ढिसाळ आहे हे नक्की. - मोनेश्वर सुतार, शेतकरी
अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर
