जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.
गावकऱ्यांनी एकमताने १५ पाणंद रस्ते खुले करून त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेतली असून, रस्त्यांना महापुरुषांची नावे देऊन सौंदर्यीकरण आणि निसर्ग संवर्धनाला हातभार लावला आहे. या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने गावाचा विशेष सन्मान केला आहे.
आडाचीवाडी गावाचे माजी उपसरपंच सूर्यकांत अनंतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गावकऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतल्या आणि वाद मिटवून १५ पाणंद रस्ते खुले करण्याचा निर्णय घेतला.
रोव्हरद्वारे मोजणी करून जिओ रेफरन्सिंगद्वारे नकाशे तयार करण्यात आले. ग्रामसभेत ठराव करून तहसीलदार पुरंदर यांच्याकडे अहवाल सादर केला गेला. यानंतर ४३२ जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांवर रस्त्यांसाठी वहिवाटीची नोंद घेण्यात आली.
रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली असून, प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला नाव आणि सांकेतिक क्रमांक असलेली प्रशस्त कमान उभारली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा ३ फूट अंतरावर ३ मीटर अंतराने नारळ आणि जांभळाच्या १,००० झाडांची लागवड करण्यात आली आहे.
यामुळे रस्त्यांचे सौंदर्य वाढले असून, निसर्ग संवर्धनाला (ऑक्सिजन निर्मिती) हातभार लागला आहे. झाडांच्या देखभालीसाठी मनरेगा योजनेतून ५ बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात आला आहे.
आडाचीवाडीच्या या अनोख्या उपक्रमाची दखल घेऊन राज्य सरकारने गावाला विशेष सन्मान दिला आहे. शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता जनसहभागाने पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या कार्याने आडाचीवाडीने महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या पत्रकार परिषदेला माजी सरपंच दत्तात्रय पवार, तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत पवार उपस्थित होते
रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण
१५ पाणंद रस्त्यांपैकी १.५ किमी लांबीच्या एका रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, ३.५ किमी लांबीच्या ३ रस्त्यांचे काम नुकतेच सुरू झाले आहे. एकूण ५ किमी लांबीचे ४ रस्ते उच्चप्रतीच्या सिमेंट काँक्रीटने बांधले जाणार आहेत. दानशूर व्यक्ती, कंपन्या आणि शासकीय मदतीच्या बळावर उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण लवकरच पूर्ण करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे.
अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?