बालाजी बिराजदार
लोहारा : कर्ज काढून, घाम गाळून पिकवलेला कांदा जेव्हा मातीमोल भावाने विकावा लागतो, तेव्हा बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील शेतकरी तुळशीराम शिंदे यांच्याबाबत असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दोन एकर क्षेत्रात कांदा लावण्यासाठी त्यांनी १ लाख ३७ हजार रुपये खर्च केले, मात्र सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ८ हजार ७२७ रुपये पडले आहेत.
तुळशीराम शिंदे यांनी मोठ्या आशेने दोन एकरात कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांनी आपली साठवलेली पुंजी खर्च केलीच, शिवाय काही रक्कम खासगी सावकाराकडून कर्ज म्हणून घेतली होती.
रोप खरेदी, खते, फवारणी आणि मजुरी असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा डोंगर त्यांनी उभा केला होता. पिकाची जोमदार वाढ पाहून यंदा कर्ज फिटेल अशी आशा त्यांना होती. मात्र, बाजारभावाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.
हैदराबादच्या बाजारात त्यांच्या पदरी केवळ ८ हजार ७२७ रुपये राहिले. आधीच शेती कर्जाखाली दबलेले शेतकरी तुळशीराम शिंदे हे या कांदा पिकातून सावरण्याच्या अपेक्षेत होते.
मात्र, प्रत्यक्षात उलट घडल्याने ते पुन्हा कर्जाच्या खाईत सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील हंगामातील शेती कशी करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
शिंदे यांना हैद्राबाद बाजारपेठेतील लिलावात एकूण पट्टी १७ हजार ५२७ रुपये इतकीच निघाली. त्यातून गाडी भाडे ८ हजार ८०० रुपये वजा जाता प्रत्यक्षात हातात केवळ ८ हजार ७२७ रुपये राहिले. यातून ना उत्पादन खर्च निघतोय, ना कर्ज फिटणार आहे.
अशी आहे खर्चाची आकडेवारी
◼️ कांदा रोप - ३० हजार
◼️ लागवड - २७ हजार
◼️ खत - १७ हजार
◼️ फवारणी - १३ हजार
◼️ खुरपणी - १८ हजार
◼️ काढणी - ३२ हजार
◼️ एकूण खर्च - १ लाख ३७ हजार
बळीराजानं जगायचं कसं?
ही व्यथा केवळ तुळशीराम शिंदे यांची नसून संपूर्ण लोहारा तालुक्यातील कांदा उत्पादकांची आहे. 'एवढ्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की पुढच्या हंगामाची तयारी? घेतलेले कर्ज कसे फेडायचे?' असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. कांद्याला हमीभाव मिळावा आणि वाहतुकीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हैदराबादच्या बाजारात झाली कवडीमोल विक्री
◼️ चांगल्या भावाच्या आशेने शिंदे यांनी आपला कांदा हैदराबाद येथील बाजारपेठेत नेला. मात्र, तिथे त्यांच्या पदरी घोर निराशा आली.
◼️ शेतकरी तुळशीराम शिंदे यांच्या नावावर ३० गट्टे कांदे घातले. यात १५ गट्टयाला २ रुपये ५० पैसे भाव तर उर्वरित १५ गट्टयाला ९ रुपये भाव मिळाला. त्यांचा मुलगा प्रतिक यांच्या नावावर घातलेल्या २६ गट्टे कांद्याला ६ रुपये ५० पैसे भाव मिळाला आहे.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावर आता पतीसोबत येणार पत्नीचेही नाव; काय आहे योजना? वाचा सविस्तर
