प्रकाश पाटील
जगात कोल्हापुरी गुळाची ख्याती आहे, पण गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी गुन्हाळघराकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात केवळ १० गुऱ्हाळघरे शिल्लक राहिली आहेत.
२००५ पूर्वी गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात १२०० गुऱ्हाळघरे होती. करवीर तालुक्यात यातील ७०० गुन्हाळघरांची संख्या होती. पण, मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटली आहे.
गुळाचा दर व प्रत यावर दर ठरत असतो, पण ती व्यवस्था व्यापाऱ्यांनी हायजॅक केली असल्याने उत्पादन खर्च व गुळाला मिळणारा दर यात तफावत निर्माण झाली असल्याने वारंवार हा व्यवसाय तोट्यात निघाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस हमीभाव देणाऱ्या साखर कारखान्यांना पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. याचाही परिणाम होत आहे.
जीआय टिकवण्याचे आव्हान
शुद्ध उसाच्या रसापासून नैसर्गिक गूळ निर्माण करण्याची प्रथा आहे. पण, यात रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. यामुळे गुळाच्या अस्तित्वाला टिकवण्याचे आव्हान आहे.
गुन्हाळघरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी गुळाला चांगला दर मिळाल्याने पुन्हा आवक वाढली आहे. शेतकऱ्यांनी दर मिळायचा असेल, तर गुळाचा वापर पोषण आहारमध्ये केल्यास मुलांचे आरोग्य चांगले होऊन शेतकऱ्यांना दर मिळेल. - अॅड. प्रकाश देसाई, सभापती कोल्हापूर बाजार समिती.
कर्नाटकी साखरेच्या गुळाचे आक्रमण
कर्नाटकात उसाच्या रसात साखर भेसळ करून मोठ्या प्रमाणात गूळ निर्माण केला जातो. हा गूळ कोल्हापूर बाजार समितीत पाठवून कोल्हापुरी गूळ म्हणून शिक्का मारून विकला जात आहे. त्यामुळे कर्नाटकी गुळाचे आक्रमण झाले आहे.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या