दत्ता पाटील
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना यंदा पावसाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसाने फळ छाटणीला उशीर झाला असून, सप्टेंबरअखेर केवळ ५ टक्के क्षेत्रावरची छाटणी झाली आहे.
यामुळे द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडला आहे. निसर्गाच्या संकटांबरोबरच नुकसानभरपाईच्या अभावाने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. द्राक्ष उत्पादकांच्या संकटावर 'गोड द्राक्षाची कडू कहाणी' ही मालिका देत आहोत...
पावसाचा तासगाव जिल्ह्यात ऐन फळ छाटणीच्या हंगामातच मुक्काम वाढला. उन्हाळ्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांना यंदाही मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.
सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत पाच टक्के क्षेत्रावर देखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे यंदा द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडणार आहे.
एकीकडे अस्मानी संकटांची मालिका सुरू असतानाच, दुसरीकडे शासनाकडून देखील मदतीच्या बाबतीत भ्रमनिरास झाला. शासनाने द्राक्ष बागायतदारांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यात तब्बल ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. मागील चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना खरड छाटणीनंतर मोठी कसरत करावी लागली. यंदा चौदा मेपासूनच पावसाळा सुरू झाला.
त्यामुळे द्राक्षबागांची काडी तयार करण्यासाठी सरासरीच्या दुप्पट खर्च करावा लागला इतके करून देखील फळधारणा होईल की नाही, याची साशंकता आहे.
जिल्ह्यात सुमारे २४ हजार एकरवर सप्टेंबर महिन्यातच फळ छाटणी घेतली जाते. आगाप फळ छाटणी घेतल्यास द्राक्षाला चांगला दर मिळतो. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आज अखेर ४००० एकर क्षेत्रदेखील फळ छाटणी झालेली नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडला आहे. फळ छाटणी घेतलेल्या बहुतांश द्राक्ष बागातून अपेक्षित द्राक्ष घड दिसत नाहीत. सततच्या पावसामुळे गोळी घडाचे प्रमाण जास्त आहे, तर रोगांचाही सामना करावा लागत आहे.
अधिक वाचा: अतिवृष्टी झालेल्या भागात 'या' तीन निकषांमध्ये अडकू शकते राज्य सरकारची मदत; वाचा सविस्तर
तालुकानिहाय द्राक्षबाग क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जत (६९०६)
वाळवा (१२१५)
मिरज (८२६८)
कवठेमहांकाळ (२८७१)
तासगाव (९२३६)
खानापूर (११२५)
आटपाडी (३६५)
पलूस (१५६१)
कडेगाव (२२९)
शासनाने ५० हजाराची सरसकट मदत द्यावी
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही द्राक्ष उत्पादकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. मात्र, द्राक्षबागांच्या नुकसानीचा पंचनामा झाला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. द्राक्ष उत्पादकांना एकरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात यावर्षीही द्राक्षबागांसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. - संदीप गिड्डे-पाटील, सरचिटणीस, भाजपा किसान मोर्चा
चार वर्षे लाखो रुपयांचा खर्च करून देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. त्यामुळे बँकेतील कर्ज थकीत आहेत. यंदादेखील मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे द्राक्षबागांना फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीचा मोबदला म्हणून दिवाळीपूर्वी सरसकट द्राक्ष बागायतदारांना एकरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी, तरच द्राक्ष बागायतदार तग धरू शकेल. - मारुती चव्हाण, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल