सोलापूर : बुधवारी मंगळवेढ्यातील नंदूर येथील अवताडे शुगर व बीबीदारफळ येथील लोकमंगल या दोन्ही साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला.
दरम्यान, व्यवस्थानाने सत्तावीसशे दराचे दिलेले पत्र मान्य न झाल्याने भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.
जिल्ह्यात यंदा ३६ साखर कारखाने गाळप हंगाम घेत आहेत. सुरू होणारे ३६ साखर कारखाने असले तरी ऊस दर जाहीर करीत नव्हते.
शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच साखर कारखाना व्यवस्थापनाने दर जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे.
बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्यांवर बीबीदारफळ व शिरापूर येथील शेतकऱ्यांच्या पुढाकारातून ऊस दरासाठी आंदोलन सुरू करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे, जनहित शेतकरी संघटनेचे भैया देशमुख व पदाधिकारी सहभागी झाले होते.
चर्चेनंतर बुधवारी प्रति टन २८०० दर एकरकमी देण्याचे शेतकरी आंदोलकासमोर चेअरमन महेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन पिसे यांनी जाहीर केले.
तिकडे मंगळवेढा तालुक्यातील अवताडे शुगरने तीन हजार रुपये दर देण्याचे पत्रकान्वये जाहीर केले.
आजवर दर जाहीर केलेल्या दोन कारखान्यांमुळे तीन हजार रुपये दर देणारे २०, अठ्ठावीससे दर जाहीर केलेले ७, तर दर जाहीर करायचे ९ कारखाने राहिले आहेत.
म्हणून कारखाना बंद पाडला
◼️ भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने १६ डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती.
◼️ बुधवारी प्रति टन २७०० रुपये दर देऊ असे पत्र दिले, मात्र शेतकरी संघटना तीन हजार रुपयांवर ठाम राहिली. त्यामुळे कारखाना बंद पाडण्यात आला.
'रयत'चे ऊस दरासाठी निवेदन
◼️ पहिली उचल साडेतीन हजार रुपये देण्यात यावी असे पत्र सिद्धेश्वर व सिद्धनाथ साखर कारखान्याला रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी दिले आहे.
◼️ ऊस हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला तरी या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. लवकर दर जाहीर केला नाही तर संघटना आक्रमक आंदोलन करेल, असे पत्रात म्हटले आहे.
◼️ निवेदन देताना प्रदेश युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक, सरचिटणीस महादेव हक्के, मारुती शेंडगे, दिगंबर ननवरे, औदुंबर व्हनमाने उपस्थित होते.
अधिक वाचा: पुणे जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने केले राज्यात सर्वाधिक उस गाळप; साखर उताऱ्यात कोण पुढे?
